
जगतापांच्या पॅनेलला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दणका; निवडणुकीत अजितदादांचे नाव, फोटो वापरण्यास बंदी
सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगतापांच्या लोकनेते अजितदादा पवार विकास पॅनेलला सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दणका दिला असून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो व नाव वापरण्यास मनाई केली आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पुरुषोत्तम जगताप यांना अजितदादांचे नाव व फोटो वापरू नये अशी सूचना केली असून, याचे पालन न केल्यास आचारसंहिता भंगाची व कायदेशीर कारवाई करू अशा सूचना केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेऊन पुरुषोत्तम जगताप यांनी वेगळा पॅनल उभा केला. हा पॅनल उभा करताना त्यांनी त्यांच्या पॅनेलला लोकनेते अजितदादा पवार विकास पॅनल हे नाव देत अजितदादांचा फोटो वापरला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लागलीच पत्रक काढत अजितदादांचा फोटो व नाव वापरण्यापूर्वी पवार कुटुंबाची परवानगी घ्यावी असे सांगितले. मात्र तरीही पुरुषोत्तम जगताप यांनी अजितदादांचे नाव व फोटो वापरला. यावर राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जगताप यांना दूरध्वनीद्वारे व तोंडी अजितदादांचे नाव व फोटो न वापरण्याबाबत सूचना केल्या मात्र तरीही जगताप यांनी अजितदादांचे नाव व फोटो वापरला. यावर आता निवडणूक निर्णय अधिकारी दिवगिजय आहेर यांनी पुरुषोत्तम जगताप यांना अजितदादांचे नाव व फोटो वापरू नये अशी सूचना केली असून याचे पालन न केल्यास आचारसंहिता भंगाची व कायदेशीर कारवाई करू अशा सूचना केल्या आहेत.
कोणतीही अधिकृत नोटीस नाही
पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, याबाबत कोणतीही अधिकृत नोटीस अद्याप मला प्राप्त झाली नसून अजितदादा हे आता महापुरुषांच्या यादीत आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो वापण्याबाबाबत काही अडचण नसावी. तरीही अजितदादा हे आमच्या हृदयात आहेत आणि ते कायम राहतील.