
Supriya sule reaction on Rohit pawar press on ajit pawar accident
बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसह दुष्काळ, शेतकऱ्यांची आर्थिक मदत, रोजगार हमी योजना आणि मतदार यादीतील त्रुटींवर भूमिका मांडली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत काही प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, “रोहित आणि दादांचे प्रेमाचे नाते होते. त्यामुळे रोहितच्या मनात अनेक प्रश्न असणे स्वाभाविक आहे. त्याच्या भावनांचा आपण सन्मान केला पाहिजे. या घटनेबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे या चौकशीचा अहवाल लवकर येऊन सत्य समोर येईल,” अशी अपेक्षा आहे.
चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर संताप; मुख्यमंत्री फडणवीसांवरील आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर
विमान अपघाताच्या चौकशीचा विषय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या प्रकरणातील अधिकार आणि चौकशीची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. रोहित पवार यांनी यापूर्वी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे वेळ मागितली होती आणि आपणही संसदेत हा विषय उपस्थित केला होता. झिरो एफआयआरच्या मागणीबाबतही संबंधित सक्षम प्राधिकरणाशी चर्चा करून माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप नेते प्रसाद लाड यांनी रोहित पवार यांच्या विधानांबाबत शरद पवार यांना पत्र लिहिल्याच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, “शरद पवार यांचे सहा दशकांचे राजकारण वेगळे राहिले आहे. त्यांनी कधीही आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला महत्त्व दिले नाही. प्रत्येकाची राजकारण करण्याची स्वतंत्र शैली असते. मात्र, मुख्यमंत्र्यांनीच कालमर्यादेत चौकशीची मागणी केली असल्याने अहवालाची वाट पाहणे योग्य ठरेल.”
शेतकऱ्यांच्या पाच हजार रुपयांसाठी पाठपुरावा
बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत माहिती देताना सुळे म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा, मुळशी आणि खडकवासळा या भागांतील अनेक नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप पाच हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित आहेत. प्रशासनाकडून अशा शेतकऱ्यांची नावे आणि कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पुढील आठवडाभर सर्व सहकारी प्रशासनासोबत समन्वय साधून या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ही मदत शेतकऱ्यांचा हक्क असून, राज्यातील वंचित शेतकऱ्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमी योजनेतील अटी-शर्ती शिथिल करण्याची मागणीही त्यांनी केली. योजनेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक असले तरी नियमांच्या अतिअटींमुळे रोजगाराची कामेच होऊ नयेत, अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये, असे त्या म्हणाल्या.
एसआयआरमधील त्रुटींवर लक्ष
विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत खडकवासळा ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कागदपत्रे पूर्ण असूनही मतदारांची नावे वगळली गेल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. प्रत्येक आठवड्यात पदाधिकाऱ्यांकडून तक्रारी संकलित करून त्यांची एकत्रित फाइल जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याने पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा देशासमोर आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षाही सुळे यांनी व्यक्त केली.
याशिवाय हिंजवडी आणि पुण्यातील वाहतूक कोंडी, उंड्रीतील वायुप्रदूषण, निरेतील प्रदूषण, फळबागांसाठी टँकरची मागणी, खडकवासळा परिसरातील रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न, तसेच भोर, वेल्हा आणि राजगड परिसरातील रस्त्यांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा झाली. या प्रश्नांचा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Ans: सुप्रिया सुळे यांनी चौकशी पारदर्शक आणि कालमर्यादेत होऊन सत्य समोर यावे, तसेच चौकशी अहवालाची प्रतीक्षा करणे योग्य ठरेल, असे म्हटले.
Ans: बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध भागांतील नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप पाच हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित असून, त्यांची माहिती व कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Ans: खडकवासळा ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आवश्यक कागदपत्रे पूर्ण असूनही काही मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या.