
‘इंडियाज् आयकॉनिक बारामती पॉवर मॅरेथॉन २०२६’चे यंदा चौथे पर्व
बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित या मॅरेथॉनची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश ननवरे, बारामती पावर मॅरेथॉन चे अध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप, सदस्य समीर ढोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लक्ष्मण भोसले, निखिल थोरवे, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि भक्कम पाठिंब्यातून सुरू झालेल्या या मॅरेथॉनचे यंदाचे पर्व त्यांना समर्पित करण्यात आले आहे. अजितदादांच्या कार्याचा गौरव, आरोग्यदायी जीवनशैली, फिटनेस आणि क्रीडा संस्कृतीचा प्रसार ही यंदाच्या आयोजनाची प्रमुख संकल्पना आहे.
मॅरेथॉन महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते स्पोर्ट्स एक्स्पो आणि बिब डिस्ट्रीब्यूशनच्या उद्घाटनाने होणार आहे. या एक्स्पोमध्ये विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा ब्रँड्सचे ३० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, क्रीडा साहित्य पाहण्यासह खरेदीची संधी उपलब्ध होणार आहे.
२७ आणि २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एक्स्पो आणि बिब वितरण सुरू राहणार आहे. सहभागी धावपटूंना यावेळी स्पर्धेचे बिब आणि किट देण्यात येणार आहेत. याशिवाय विविध गेम्स, मॅजिक शो, फूड स्टॉल्स आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे मॅरेथॉनचा हा महोत्सव धावपटूंसह संपूर्ण कुटुंबासाठी आकर्षण ठरणार आहे.
रविवार, २९ नोव्हेंबर रोजी रेल्वे स्टेशन ग्राउंड, बारामती येथून मुख्य मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ होणार असून, धावपटूंसाठी चार प्रकारांत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
४२ किमी फुल मॅरेथॉन – पहाटे ४ वाजता
२१ किमी हाफ मॅरेथॉन – सकाळी ६ वाजता
१० किमी रन – सकाळी ६.३० वाजता
५ किमी फन रन – सकाळी ७.५५ वाजता
अनुभवी धावपटू, नवोदित, युवक-युवती, कुटुंबीय आणि फिटनेसप्रेमी नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी विविध अंतरांच्या स्पर्धांची आखणी करण्यात आली आहे.
यंदाच्या मॅरेथॉनमध्ये एकूण १० लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. चारही स्पर्धा प्रकारांमध्ये विविध वयोगटांनुसार पारितोषिके दिली जाणार असून, प्रत्येक गटातील प्रथम तीन धावपटूंचा गौरव करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने धावपटू सहभागी करून घेणाऱ्या शाळा, महाविद्यालये आणि रनिंग ग्रुप्सनाही विशेष ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये आणि विविध धावपटू समूहांमध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे.
Young India Marathon : दमट हवामान, चढ-उताराचा रस्ता; तरीही लवप्रित, रविनाची विजयी भरारी
वर्ल्ड ॲथलेटिक्सच्या निकषांनुसार प्रमाणित व मोजलेला मार्ग आणि AIMS च्या सहकार्यामुळे बारामती पॉवर मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी मार्गावर हायड्रेशन सपोर्ट, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन मदत आणि स्वयंसेवकांची फळी सज्ज राहणार आहे. धावपटूंना उच्च दर्जाचे टी-शर्ट, आकर्षक फिनिशर मेडल्स आणि पौष्टिक नाष्ट्याची सुविधा देण्यात येणार आहे.
सन २०२३ मध्ये अवघ्या ७२७ धावपटूंच्या सहभागाने सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये यंदा ७,२७० धावपटूंनी नोंदणी केली आहे. चार वर्षांत धावपटूंच्या संख्येत झालेली दहापट वाढ बारामतीच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या लोकप्रियतेचे द्योतक आहे. बारामती पॉवर मॅरेथॉनच्या माध्यमातून शहरात फिटनेस संस्कृती, आरोग्यदायी जीवनशैली आणि क्रीडाप्रेमींसाठी एक व्यापक व्यासपीठ निर्माण होत आहे. तीन दिवसीय महोत्सवामुळे पर्यटन, आदरातिथ्य, स्थानिक व्यवसाय आणि आर्थिक उलाढालीलाही चालना मिळणार असून, बारामतीच्या क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Ans: स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना समर्पित बारामती पॉवर मॅरेथॉनचे चौथे पर्व २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
Ans: या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात तब्बल ७,२७० धावपटू सहभागी होणार आहेत. यामध्ये १० लाख रुपयांची पारितोषिके, ३० स्टॉल्सचा स्पोर्ट्स एक्स्पो आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.