
गाढवे पट वस्तीवर बिबट्याचा मुक्त संचार! ओतूर परिसरातील नागरिक भयभीत; वनविभागाच्या कारवाईकडे लक्ष
ओतूर : ओतूर परिसरातील गाढवे पट वस्तीवर गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याची माहिती समोर आली असून, बिबट्याच्या दर्शनामुळे वस्तीवरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे, शेतातील कामे करणे तसेच जनावरे सांभाळणे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे. बिबट्याचा वावर असूनही वनविभागाकडून अपेक्षित गांभीर्याने उपाययोजना होत नसल्याची नाराजी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
गाढवे पट वस्ती ही शेतीप्रधान भागात असून परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी, ऊस तसेच दाट गवत असल्याने वन्यप्राण्यांना लपण्यासाठी पोषक वातावरण आहे. याच परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्या वस्तीच्या आसपास फिरताना दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकरी यांना बिबट्याच्या संभाव्य हल्ल्याची चिंता सतावत आहे. रात्री उशिरा शेतातून घरी परतणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने शेताकडे जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे.
बिबट्याचा वावर असल्याने पाळीव जनावरेही धोक्यात आली आहेत. शेळ्या, वासरे, कुत्री यांच्यावर बिबट्याची नजर असल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी जनावरांच्या गोठ्याजवळ विशेष खबरदारी घेत आहेत.
वनविभागाने तातडीने पिंजरा व कॅमेरे लावावेत
गाढवे पट वस्तीवरील बिबट्याचा वावर लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून ट्रॅप कॅमेरे बसवावेत, बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा आणि आवश्यक असल्यास पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी वनविभागाचे गस्ती पथक तैनात करून नागरिकांना मार्गदर्शन करावे, अशीही मागणी आहे. वन्यप्राणी आणि नागरिक यांच्यातील संघर्ष वाढण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. केवळ बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी त्याच्या हालचालींचा अभ्यास करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे गाढवे पट वस्तीवर भीतीचे सावट निर्माण झाले असून, वनविभाग आता तरी जागा होणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.