
हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला 'हा' नवीन प्लॅन
पुणे : पुणे शहर आणि परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता हिंजवडी-शिवाजीनगर दरम्यान धावणाऱ्या पुणे मेट्रो मार्ग-3 वरील प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे. त्यानुसार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पावले उचलली आहेत. या मेट्रो मार्गावरील हिंजवडी भागातील पहिल्या आठ स्थानकांसाठी सुमारे 19.2 किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते आणि पादचारी नेटवर्क विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात डोहलर, मेगापोलिस सर्कल, क्वाड्रॉन सर्कल, इन्फोसिस फेज 2, विप्रो टेक्नॉलॉजीज, पॉल इंडिया, शिवाजी चौक आणि हिंजवडी या स्थानकांचा समावेश आहे. या परिसरातील सुमारे 10 किलोमीटर लांबीच्या मेट्रो पट्ट्यात १९.२ किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्यांची जोडणी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ४.८९ किलोमीटरचे रस्ते जाळे शिवाजी चौक स्थानकाभोवती, ४.०६ किलोमीटरचे जाळे मेगापोलिस सर्कलजवळ, ३.६ किलोमीटरचे जाळे क्वाड्रॉन सर्कलजवळ आणि १.८५ किलोमीटरचे जोड रस्ते हिंजवडी स्थानकाभोवती विकसित केले जातील.
दुसऱ्या बाजूला, सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय आणि जिल्हा न्यायालय या उर्वरित चार स्थानकांच्या सीएमआरएस मंजुरीसाठी आवश्यक ती कागदपत्रे व डेटा अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तपासणीनंतर या स्थानकांना मंजुरी मिळताच ती पहिल्या टप्प्याशी जोडली जातील. प्रत्यक्ष उद्घाटन होईपर्यंत सर्व १६ स्थानकांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपाययोजना
मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र पादचारी मार्ग (फूटपाथ), शक्य तिथे सायकल ट्रॅक, सुरक्षित पादचारी क्रॉसिंग, स्पीड-टेबल क्रॉसिंग, रस्त्यांवरील दुभाजक सुधारणा आणि पादचारी रिफ्युज आयलंड उभारले जातील. याशिवाय बस व रिक्षा थांबे, वाहनतळ व्यवस्था (पार्किंग), पथदिवे, माहिती फलक आणि वाहतूक नियंत्रक उपाय केले जातील. पीएमआरडीएच्या आराखड्यानुसार हा प्रकल्प केवळ रस्ते रुंदीकरणापुरता मर्यादित नाही. तो सर्वसमावेशक पादचारी व वाहतूक व्यवस्थापनावर आधारित असल्याचे म्हटले आहे.