
Wai Sugarcane Transport : ऊस वाहतुकीचा बेफिकीर कारभार आणखी किती जीव घेणार?; रिफ्लेक्टरविना ट्रॉल्या बनताहेत मृत्यूचे सापळे
Wai Sugarcane Transport : वाई शहरासह संपूर्ण तालुक्यात ऊस वाहतुकीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. मात्र, या वाहतुकीदरम्यान सुरक्षेच्या नियमांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय उभ्या केल्या जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॉल्या अपघातांना निमंत्रण देत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर आणि सुरक्षा दिवे नसलेल्या ट्रॉल्या वाहनचालकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत.
अनेक ट्रॅक्टर ट्रॉलींच्या मागील बाजूस रात्री स्पष्टपणे दिसतील असे रिफ्लेक्टर किंवा रिफ्लेक्टिव्ह टेप नसतात. काही ठिकाणी ऊसाने भरलेल्या ट्रॉल्या रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्यालगत उभ्या केल्या जातात. अशा वेळी मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांना आणि चारचाकी वाहनचालकांना या ट्रॉल्यांचा अंदाज येत नाही. अचानक समोर आलेल्या अडथळ्यामुळे वाहनांची धडक होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता असते.
दरवर्षी ऊस गाळप हंगाम सुरू झाला की ऊस वाहतुकीतील निष्काळजीपणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. अपघात होतात, निष्पापांचे जीव जातात आणि काही दिवस या विषयावर चर्चा होते. मात्र, हंगाम संपल्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होते. पुढील वर्षी पुन्हा तोच प्रकार सुरू होतो. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी, चालकांनी आणि वाहतूकदार संघटनांनी सुरक्षेचे गांभीर्य ओळखणे आवश्यक आहे. संबंधित साखर कारखान्यांनीही आपल्या वाहतूकदारांना स्पष्ट सूचना द्याव्यात. प्रत्येक ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या पुढील-मागील बाजूस रिफ्लेक्टर, रिफ्लेक्टिव्ह टेप आणि आवश्यक सुरक्षा दिवे बसविणे बंधनकारक करावे. क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरणे आणि रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणे यावर नियंत्रण ठेवावे.
कारखान्यांना ऊस हवा, वाहतूकदारांना काम हवे आणि चालकांना रोजगार हवा; मात्र या प्रक्रियेत सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता कामा नये. कारखान्यांनी केवळ ऊस वेळेत पोहोचविण्याचे नियोजन न करता सुरक्षित वाहतुकीची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. रात्रीच्या वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याबरोबरच ट्रॉल्या रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
वीजबिल वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान; पुणे विभागात तब्बल 438.8 कोटी रुपये थकीत
वाई तालुक्यातील वाहतूक पोलिसांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलींची विशेष तपासणी मोहीम राबवावी. रिफ्लेक्टर नसलेली, आवश्यक दिवे नसलेली आणि धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. वाहतूकदार संघटनांची बैठक घेऊन सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना द्याव्यात.
अपघात झाल्यानंतर पंचनामे आणि कारवाई करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ऊस वाहतूक हा शेती आणि साखर कारखान्यांच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असला, तरी त्यासाठी सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे कारखाने, ट्रॅक्टर मालक, चालक, वाहतूकदार संघटना आणि वाहतूक पोलिसांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाई तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
Ans: ऊसाने भरलेल्या ट्रॉल्या रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने उभ्या केल्या जात आहेत. अनेक ट्रॉल्यांवर रिफ्लेक्टर आणि सुरक्षा दिवे नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
Ans: अंधारात रिफ्लेक्टर किंवा सुरक्षा दिवे नसलेल्या ट्रॉल्या वाहनचालकांना सहज दिसत नाहीत. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची धडक होण्याची शक्यता असते.
Ans: ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या पुढील-मागील बाजूस रिफ्लेक्टर, रिफ्लेक्टिव्ह टेप आणि आवश्यक सुरक्षा दिवे असणे गरजेचे आहे.