Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात होतोय बदल; गोंदिया, चंद्रपूरसह अनेक भागांत पावसाची शक्यता (File Photo)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या मध्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रात होताना दिसत आहे. विदर्भातील हवामानावर याचा फरक दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा अनुभव मिळत आहे. त्यातच आता पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे जरी असले तरी पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल. त्यानंतर तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात बुधवारी सायंकाळनंतर वातावरणात गारवा वाढल्याने थंडीची जाणीव होऊ लागली. सकाळच्या सुमारास नागपूरसह विदर्भातील अनेक भागांत धुक्याची चादर पसरली होती. त्यामुळे बुधवारी नागपुरात कमाल तापमान २९.६ अंश तर किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदविले.
दरम्यान, दिवसा उन्हामुळे वातावरण काहीसे उष्ण जाणवत असले तरी सायंकाळी ५ वाजल्यानंतर गारवा वाढत आहे. अकोला येथे विदर्भातील सर्वाधिक ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर गोंदिया येथे सर्वात कमी १४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले.
पुढील 5 दिवसांत तापमानात वाढ
काही ठिकाणी दृश्यमानता २ हजार ते ४ हजार मीटरपर्यंत नोंदवली. प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ बुधवारी सकाळी आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकले. किनारपट्टीच्या भागात या वादळाचा वेग ताशी ९० ते ११० किलोमीटरपर्यंत पोहोचला. या हवामान प्रणालीचा अप्रत्यक्ष प्रभाव विदर्भावरही जाणवणार आहे. सध्या कमाल तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज असला तरी त्यानंतर थंड वारे वाहू लागतील. त्यामुळे पुढील आठवड्यात विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
FAQ
1. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे?
चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
2. विदर्भात कशा प्रकारचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे?
काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
3. महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याचे कारण काय आहे?
पश्चिम बंगालच्या मध्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होण्याची शक्यता आहे.






