
‘अजितदादांचे विचार पुढे न्यायचे असतील तर कारखाना माझ्या हातात द्या’; युगेंद्र पवारांचे आवाहन
बारामती/सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष बारामती तालुक्यात येण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सोमेश्वरचे सभासद खूप सुज्ञ आहेत. ते आपल्या भविष्याचा विचार करून निर्णय घेतील. स्वर्गीय अजितदादांचे विचार घेऊन पुढे जायचे असेल तर कारखाना माझ्या हातात द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरदचंद्र पवार ) युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत वाढली असताना करंजे येथील सोमेश्वर मंदिरात श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, कारखाना हा सभासदांच्या प्रपंचाचा प्रश्न आहे. त्याला धक्का बसू नये म्हणून शरद पवार कारखान्यात लक्ष घालणार आहेत. संचालक मंडळाला सहकार्य करणार आहेत. अजितदादानंतर सोमेश्वर कारखान्याला शरद पवारांशिवाय पर्याय नाही. शरद पवार सातत्याने शेतकऱ्यांचे हित बघतात. त्यांना सहकाराचा खूप मोठा अनुभव आहे. त्यामुळे शरद पवारांच्या विचारांचे संचालक मंडळ निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
मला कारखान्यातील बऱ्यापैकी ज्ञान आहे त्यामुळे आमचे पॅनल निवडून आल्यावर आठवड्यातील एक दिवस मी स्वतः सोमेश्वर कारखान्याचा कार्यालयात बसून कामकाजाचा आढावा घेणार आहे. त्यासाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेणार आहे. येणाऱ्या काही दिवसात एकमेकांवर चिखलफेक होईल. टीका होतील. मात्र आपण त्याच्यात पडणार नसून आपल्यासाठी सभासद हित महत्त्वाचे आहे. वैयक्तिक टीकेपेक्षा माझा सकारात्मक प्रचारावर भर आहे, असंही युगेंद्र पवार म्हणाले.
यावेळी युगेंद्र पवार यांनी आपल्या पॅनल मधील सर्व उमेदवारांची ओळख करून देत पॅनलचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताआबा चव्हाण, बारामती पंचायत समितीचे माजी सभापती पोपट पानसरे, शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्यासह मोठ्या प्रमाणावर सभासद उपस्थित होते.
कपबशीला किटलीची गरज
शिट्टी म्हणजे धोक्याची घंटा आहे. शिट्टी वाजली म्हणजे भाजप आपल्या तालुक्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे अशी सूचना आहे. तर कपबशी मध्ये चहा ओतायचा असेल तर कपबशीला किटलीची गरज लागणारच अशी कोटी त्यांनी केली. तर पत्रकार परिषदेत येणाऱ्या काळात किटली व कप बशी एकत्र येणार का या प्रश्नावर ते किटलीने ठरवायचे असे सूचक उत्तर त्यांनी दिले.