माणगांव/ रविंद्र कुवेसकर : वन्य प्राण्यांची तस्करी होत असतानाच्या पार्श्वभूमीवर माणगावात मात्र सकारात्मक चित्र पाहण्यास मिळालं. जंगलपरिसरात दुर्मिळ प्रजातीचं खवले मांजर आढळून आल्याने गावरऱ्यांच्या सहकार्यानेमुळे वनविभागाकडे सुपुर्द करण्यात यश आले. माणगांवमधील खांदाड गावातील तरुण नेहमीच पर्यावरणाप्रती जागरूक असतात हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. शुक्रवार दिनांक १८ जुलै रात्री साधारण ९:३० च्या सुमारास माणगावातील खांदाड गावात येथील स्थानिक तरुण राजू पवार हे आपली मोटारसायकल घेऊन सोनभैरव मंदिराकडे जात असताना गावाजवळ वस्तीलगत त्यांना एक अनोळखी विचित्र वन्यजीव जमिनीवर दिसून आला, त्यानंतर राजू पवार व त्यांचे मित्र शशिकांत पवार हे हा वन्यजीव कोणता आहे हे पाहण्यासाठी थांबले, मंदिर परिसरात गावकीची मीटिंग असल्यामुळे गर्दी जमली होती आणि हा वन्यजीव कोणता आहे याबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्यामुळे त्वरित ग्रामस्थांनी माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना संपर्क साधला.
वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर तातडीने येथे पोहोचले व त्यांनी वनविभागालादेखील याबद्दल त्वरित माहिती दिली, वनरक्षक येथे पोहोचेपर्यंत कुतूहलापोटी जमलेल्या खांदाड गावच्या सर्व तरुणांना व ग्रामस्थांना खवले मांजर या प्राण्याची ओळख पटवून देत या प्राण्याबद्दल जनजागृती करत शंतनु कुवेसकर यांनी जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
खांदाड गावात व गावाच्या आजूबाजूच्या परिसरात खवले मांजर कायमस्वरूपी राहण्यायोग्य कोणताही नैसर्गिक अधिवास उपलब्ध नाही. त्यामुळे हे खवले मांजर सध्याच्या पूरपरिस्थितीमध्ये काळ नदीच्या पूर प्रवाहात पश्चिमेकडील घनदाट जंगलांच्या पट्ट्यातून कुठून तरी वाहून येथे आल्याची शक्यता वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी वर्तवली आहे.
खांदाड गावच्या सर्व तरुणांनी व जेष्ठ ग्रामस्थांनीदेखील अश्या प्रकारचा वन्यजीव गावात आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला असल्याचे सांगितले आहे, गावाला लागून काळ नदी आहे, येथे मगरींचा वावर नेहमीच असतो परंतु कोणत्याही प्रकारचा घनदाट जंगल परिसर येथे जवळपास नाही. वन्यजीव आणि पर्यावरणाबद्दल खांदाडचे तरुण आणि जेष्ठ अतिशय संवेदनशील असून खवले मांजराची काही काळासाठी परिसरातील भटके कुत्रे आणि इतर धोक्यांपासून रक्षा करून मानववस्तीनजीक आढळल्याने एका प्रकारे त्याचे बचावकार्यच सर्व तरुण व जेष्ठांनी केले आहे विशेष म्हणजे सदर ठिकाणी माणगांवचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, तसेच गावकीचे अध्यक्ष काशीराम पवार, गावचे पोलीस पाटील नथुराम पोवार सर्व युवावर्ग ग्रामस्थांसोबत उपस्थित होते.
शंतनु कुवेसकर यांच्या मार्फत सदरचे सशक्त तंदुरुस्त असलेले खवले मांजर त्वरित वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले, त्यानंतर रात्री वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेंद्रकुमार जाधव व सहाय्यक उपवनसंरक्षक रोहित चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांवचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे उपस्थित वनपाल डी. एस. सुभेदार, वनरक्षक वैशाली भोर, पवन चौधरी संतोष पिंगळा, राणी लिंबोरे, वाहनचालक विवेक जाधव यांच्यामार्फत पुढील योग्य ती कार्यवाही करून खवले मांजरास सुरक्षित ठिकाणी त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे असे वनविभागाकडून कळवण्यात आले.
इंडियन पँगोलिन म्हणजेच खवले मांजर हा जीव जगातील सर्वात जास्त तस्करी होणारा प्राणी असून, खूप संवेदनशील आहे, वन्यजीव संरक्षण कायद्यात त्याला सर्वोच्च दर्जाचे स्थान तसेच सर्वोच्च दर्जाचे संरक्षण प्राप्त आहे, सदरच्या वन्यजीवाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता खांदाड गावच्या ग्रामस्थांनी त्याचे रक्षण करून वन्यजीव संरक्षणाचे अतिशय स्तुत्य कार्य केले आहे.