रायगड : पनवेल ग्रामीण, खारघर, कोपरा यथे बार आणि रेस्टोरंट करिता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोच्या वतीने मंगळवारी ( ता.28) कारवाई करण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष अजित अडसूळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत करण्यात आलेल्या या कारवाई बाबत परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खारघर – कोपरा परिसरातील सेक्टर १० परिसरात भंगार गोदाम, हॉटेल, बार, रेस्टॉरंट धारकांनी कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केले होते.
या अनधिकृत बांधकामांस सिडको विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटवणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. या अनधिकृत बांधकामावर सिडको अतिक्रमण विभाग यांच्याकडून कारवाई करण्यात आली. त्यानुसार अनधिकृत बांधकाम पोकलेनच्या साहाय्याने पुर्णत: जमीन धस्त करण्यात आले.