
CIDCO News: सिडकोला मोठा धक्का; Bombay High Court निर्णयामुळे शेकडो कोटींचे नुकसान होणार? (फोटो सौजन्य: Social)Media
CIDCO News: सीबीडी बेलापूर येथे सिडकोने फक्त तारांकीत हॉटेल उभारण्यासाठी भाडेकराराने दिलेल्या भूखंड प्रकरणात, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पडसाद आता सिडकोच्या भूखंड विक्रीवर होण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे पीव्हीपी स्टार हॉटेल विकासकाला प्रचंड फायदा होणार असून सिडकोचे मात्र शेकडो कोटींचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे सिडकोने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
याप्रकरणी न्यायमूर्ती ए. एस. गडकरी व न्यायमूर्ती श्याम सी. चांडक यांच्या खंडपीठाने १० डिसेंबर २०२५ रोजी दिलेला आदेश सध्या चर्चेचा विषय झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यकर्ते व अधिकाऱ्यांशी संगनमत करुन विकासकांचा सिडको संचालक मंडळाने मंजूर केलेल्या भूखंड वापर बदल ठरावाचा फायदा घेत तारांकित हॉटेल उभारणीसाठी विक्री केलेले भूखंड वाणिज्य अथवा निवासी वापराखाली आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर राज्यकर्त्यांच्या दबावाखाली तारांकित हॉटेलच्या नावाखाली भूखंड विक्रीस काढून ते ठराविक बिल्डर्सच्या घशात घालण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराची नवी दुकाने सुरु केली असल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत.
पूर्वी वाटप केलेले भूखंड चौकशीच्या फेऱ्यात
त्यामुळे तारांकीत हॉटेलसाठी भूखंड विक्री करायची आणि अल्प प्रिमियम आकारून तेथे निवासी व व्यावसायिक वापरासाठी परवानगी देऊन भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे धंदे आता सिडकोत जोराने सुरू आहेत. चौकट तारांकित हॉटेल भूखंड वाटपात यापूर्वी देखील भ्रष्टाचार, तारांकित हॉटेलकरिता सिडकोने यापूर्वी वाटप केलेले भूखंड देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. २००८ साली सिडकोने पामबीच मार्गावर एनआरआय कॉम्प्लेक्स समोर सेक्टर-४६ मध्ये तब्बल ४७ हजार चौ. मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अविनाश भोसले यांच्या मेट्रो पोलिस हॉटेलला १८० कोटी रुपयास निविदेद्वारे दिला होता.
पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी भूखंडाची विक्री
मात्र त्या भूखंडावर हॉटेल न उभारता अविनाश भोसले यांनी सदर भूखंड दोन तुकड्यांमध्ये भिन्न विकासकांना ९०० कोटीहून अधिक रक्कमेला विकला असून त्या बिल्डर्सना निवासी व वाणिज्य वापराकरिता भूखंड वापर बदलाची परवानगी देखील सिडकोने दिली आहे. त्याचपद्धतीने पीव्हीपी व्हेंचर्स या हाँगकाँग बेस कंपनीला देखील सिडकोने बेलापूर किल्ला परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी भूखंडाची विक्री केली होती. मात्र त्या कंपनीने देखील स्टार हॉटेलची उभारणी न करता सदर भूखंड सिडकोची कोणतीही पुर्व परवानगी न घेता, नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला विकला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
त्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाने सदर भूखंडाच्या वापरात बदल करण्याकरिता राज्यकर्त्यां द्वारे सिडकोवर दबाव सुरू ठेवला होता. अखेर त्या बांधकाम व्यावसायिकाला भूखंडाचा वापर बदल करून घेण्यात नुकतेच यश आले आहे. याशिवाय नोव्हेंबर २०२२ मध्ये सिडकोने अपोलो हॉस्पिटल नजीकचा भूखंड तारांकित हॉटेलकरिता विक्रीस काढताना तारांकित हॉटेलचा अनुभव नसलेल्या कंपन्यांना व बिल्डर्सना निविदेत सहभागी करून घेतल्याने या भूखंड विक्री योजनेतून भ्रष्टाचाराचे नवीन कुरण उघडल्याची ओरड झाली होती.