
Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?
पूर्वी ‘फार्म हाऊसेस’चा तालुका म्हणून ओळखला जाणारा कर्जत तालुका मागील २-४ वर्षापासून रहिवाशी संकुलांचा तालुका बनू पाहत होता. कर्जत तालुका आपली ‘कृषी प्रधान तालुका’ अशी ओळख हरवून बसला आहे. फार्म हाऊसेस आणि सेकंड होममुळे कर्जत तालुका डेस्टिनेशन कर्जत बनला होता. त्यात टाटा, गोदरेज, लोढा, कोटक, व्हिडिओकॉन सारख्या मोठ्या बांधकाम कंपन्यांनी कर्जतमध्ये आपली पाळेमुळे घट्ट करण्यास सुरुवात केली आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
उपनगर रेल्वेने जोडलेल्या या तालुक्यात आता मोठ्या प्रमाणावर धरणे आणि वीज प्रकल्प येऊ घातले आहेत. १०० वर्षापूर्वी टाटा समूहाने येथे वीज प्रकल्प सुरू केला आणि आता अनेक कंपन्या कर्जतमध्ये वीज प्रकल्प उभे करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत, टाटा समूहाचा दुसरा वीज प्रकल्प त्यांच्याच अतिरिक्त जमिनीवर होत आहे. दररोज हजारो मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलेल्या टोरंट कंपनीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने पायघड्या घातल्या आहेत. त्यात आता भर पडली आहे ती देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या अदानी समूहाची.
हजारो एकर जमीन बांधकाम व्यावसायिक कंपन्या यांच्याकडे आहे. कर्जत तालुक्यात कोणत्याही प्रकारची औद्योगिक वसाहत नसल्याने फार्म हाऊसेस सोसायट्या आणि आता रिसॉर्ट यांची साखळी निर्माण झालेली आहे, मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट हे स्थानिक शेतकऱ्यांनी उभारले आहेत आणि त्यामुळे पर्यटन व्यवसाय भरभराटीला आला आहे. मात्र धरणे आणि वीज प्रकल्प कर्जत तालुक्याचे जनजीवन बिघडवण्याची शक्यता आहे.
अदानी समूहाने कर्जतमध्ये ८०० एकर जमिनीवर पॉवर हब बनवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अदानीकडून कशेळे परिसरात जमिनीची खरेदी सुरू आहे. त्या भागात पुणे येथील बांधकाम कंपनीची ३०० एकर एकसंघ जमीन खरेदी केली आहे. त्याचवेळी चोरिवली, सुगवे तसेच धारेवाडी, रामाचीवाडी मधील जमिनीकडे लक्ष वळवले आहे. तेथील साधारण ८०० एकर जमिनीवर अदानी समूह वीज प्रकल्प उभारणार असल्याची कुणकुण स्थानिक शेतक-यांनी लागली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी जमिनीचे भाव वाढवले आहेत.
अदानी सारख्या मोठ्या उद्योग समूहासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मिळाव्यात म्हणून मोठ्या एजंट लोकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे अदानी समूहाचा प्रकल्प होण्याची चर्चा खरी आहे असे जाहीरपणे बोलले जाऊ लागले आहे. अदानी समूहा कडून मुंबईतील राजकीय मंडळी शेतकऱ्यांकडे येत असल्याची चर्चा आहे.