कर्जत/ संतोष पेरणे : शहरात सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे तसंच अरुंद रस्ते आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहनांच्या लांब लांब रांगा लागत असल्याने वाहन चालक आणि रहदारी करणाऱ्य़ा नागरिकांना देखील दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या डोकेदुखी होत चाललेली आहे. शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर, कर्जत शहर बचाव समिती आक्रमक झाली असून कर्जत बचाव समितीच्या वतीने वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर निवेदन दिले.कर्जत शहरातील प्रमुख वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तातडीने आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहेत. त्यामुळे बाजारपेठ, श्रीराम पूल आणि चारफाटा परिसरातील नो-एंट्रीचे उल्लंघन, ट्राफिकचे अकार्यक्षम नियमन आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे होणाऱ्या तणावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचसाठी बचाव समितीने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत: यामध्ये बाजारपेठ आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ट्राफिक फाईन प्रणाली सक्षम करणे., नो-एंट्री झोनमध्ये टायर किलर बसवणे जेणेकरून निषिद्ध प्रवेश थांबवता येईल. श्रीराम पूल व चारफाटा येथे सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करणे जेणेकरून ट्राफिक पोलिसांवर भार कमी होईल. शहरासाठी कायमस्वरूपी ट्राफिक पोलिसांची नियुक्ती करणे ही गरज वेळोवेळी अधोरेखित केली जात आहे. बचाव समितीने कर्जत नगरपरिषद व पोलिस प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून ही समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी केली आहे.
या निवेदनप्रसंगी समितीचे सदस्य तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.कर्जत सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी ही समस्या गंभीर असून, उपाययोजना त्वरित राबवली नाही, तर वाहतूक कोंडीमुळे शहराचे सर्वसामान्य जीवनमान अधिकच विस्कळीत होण्याची शक्यता आहे.यावेळी कर्जत शहर बचाव समितीचे ॲड.कैलास मोरे, राजेश लाड,रंजन दातार, मिलिंद भागवत, विजय बेडेकर, दीपक बेहरे, सुधांशू वानगे, कर्णिक, प्रशांत उगले, अनिल भोसले, भाऊ खानविलकर,लोकेश यादव,स्विटी बार्शी, सतीश मुसळे आदी समन्वयक उपस्थित होते.
शहरातील वाहतूक कोंडी बाबत गेली काही महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाने सहकारातून समस्या सोडवाव्यात. नागरी प्रश्न सुटले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्जत शहर बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे यांनी दिला आहे.