कर्जत/ संतोष पेरणे : मुंबई रेल्वे महामंडळ यांच्याकडून . नेरळ स्थानकात स्काय वॉक उभारण्यात आलेला आहे.नेरळ स्थानकातील हा स्कायवॉक एकाच वेळी तीन पादचारी पूलांना जोडणारा असून एकाचवेळी दोन पादचारी पूल आणि स्कायवॉक प्रवासी वर्गासाठी खुले करण्यात आले आहेत.
मध्यरेल्वेवरील कर्जत मार्गावर नेरळ जंक्शन स्थानक असून या स्थानकातून माथेरान या पर्यटन स्थळी जाणारी मिनी ट्रेन चालवली जाते.त्यामुळे या स्थानकाचे असलेले महत्व लक्षात घेऊन नेरळ स्थानकात अनेक विकासाची कामे सुरू आहेत.त्यात नेरळ स्थानकाचा कायापालट करण्याचा प्रयत्न या भागाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या खासदारकीच्या काळात केला आहे.त्यांच्या पुढाकाराने नेरळ स्थानकात पादचारी पूल,तसेच सरकते जिने आणि उद वाहन आणि स्थानकातून बाहेर जाण्यासाठी स्काय वॉक अशी कामे सुरू आहेत.त्यात फलाट एकवर उतरणारे प्रवासी यांना थेट बाजारपेठेत जाण्यासाठी महत्वाचा ठरणारा स्काय वॉक बांधला जात होता.हा स्काय वॉक फलाट एक वरून मिनी ट्रेन चे मार्गावरून थेट रेल्वे पार्किंगमध्ये उतरला आहे.
त्यामुळे या मोठ्या आणि महत्वकांक्षी प्रकल्पाचे पाठपुरावा खासदार बारणे यांच्याकडून घेण्यात येत होता.आता हा स्काय वॉक सुरू झाला असून फलाट एक किंवा दोन वर उतरणारा प्रवासी थेट बाजारपेठ भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत जाऊ शकणार आहे.त्यामुळे प्रवाशांना नेरळ स्थानकाच्या बाहेर गर्दीमधून जाण्याचे संकट दूर झाले आहे.हा स्काय वॉक साधारण एक किलोमीटर लांबीचा असून हा स्काय वॉक सुरू झाल्याने माथेरान येथून येणारे पर्यटक आता थेट नेरळ स्थानकात पोहचू लागले आहेत.
नेरळ गावातून उपनगरीय लोकल साठी बाहेर पडलेले प्रवासी हे नेरळ स्थानकात पोहचणार आहेत.त्यामुळे स्काय वॉक वर प्रवासी वर्गासाठी उपनगरीय गाड्यांचे तिकीट काढण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.तशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटना यांच्याकडून मध्य रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे केली गेली आहे.स्थानकातील या स्काय वॉक वर किमान दोन स्थानकाच्या पादचारी पुलाच्या ठिकाणी तिकीट घरे असावेत अशी मागणी आहे.
अत्याधुनिक सेवासुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण झालंअसलं तरीही सुरक्षेचा प्रश्न अद्यापही तसाच आहे. हा स्काय वॉक रात्रीच्या वेळी गर्दुले आणि चोरांच्यादृष्टीकोनातून अत्यंत घातक आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासनाने तत्काळ त्या स्काय वॉक वर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी प्रवासी करीत आहेत.त्याचवेळी रात्रीच्या वेळी होमगार्ड यांची फेरी आणि एक दोन होमगार्ड सतत बसलेले असले पाहिजेत अन्यथा एकट्या प्रवासासाठी हा स्काय वॉक रात्रीच्यावेळी धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेचा देखील विचार करावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.