रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये रात्री साडे अकरा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे.जवळपास 271. 4 मिलिमीटर इतकी मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.गेल्या 10 तासात झालेल्या या भरमसाठ पावसामुळे आज पहाटेच्या सुमारास नेरळ माथेरान घाट रस्त्यात जुम्मा पट्टी नागरखिंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावर आल्यामुळे काही काळासाठी येथील प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती.
सकाळी सहा वाजता माथेरानहून सुटणारी मिनी बस देखील माथेरानला येत असताना या दरड कोसळलेल्या नागरखिंडी येथे अडकल्याने प्रवासी तसेच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत. नेरळ माथेरान घाट रस्ता हा प्रवासी वाहतुकीसाठी एकमेव रस्ता असल्याने स्थानिक टॅक्सी चालकांनी सदर बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. यावेळी माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र सिंग ठाकूर यांनी PWD चे वानखेडे यांच्याशी संपर्क साधून नेरळ माथेरान घाट रस्त्यात दरड कोसळल्याचे कळवले.
यावेळी PWD कडून देखील युद्ध पातळीवर यंत्रसामुग्री तसेच मनुष्यबळाची कुमक पाठवून सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला आहे. पुढील तीन तासासाठी रायगड ठाणे मुंबईसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने नागरिकांनी प्रवास करताना स्वतःची काळजी घ्यावी असे आव्हान माथेरानचे अधिक्षक सुरेंद्र सिंग ठाकूर यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.
राज्यात सर्वत्र पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. गेले दोन दिवस उसंत घेतलेल्या परतीच्या पावसाने आता पुन्हा एकदा जोरजार बॅटींग करायला सुरुवात केली आहे. राज्यासह देशातील इतर भागात देखील दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. मागच्या 24 तासांमध्ये देशातील हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड राज्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तेलंगणा, गोवा, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, आणि दक्षिणेकडील काही राज्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र आज राजधानी दिल्लीत वातावरण मोकळे असण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशमध्ये देखील आज पावसाची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. अनेक नद्यांची पाणीपातळी देखील कमी झाली आहे. मात्र बिहार राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांत या दोन्ही राज्यात नैसर्गिक आपत्ती देखील आल्याचे पाहायला मिळाले. बागेश्वर, चंपावर, चमोली, पिठोरागड भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.