
कर्जत शहरात 1870 मध्ये स्थापन झालेली जीवन शिक्षण मंदिर ही शाळा आहे.लोकल बोर्ड अंतर्गत सुरू झालेल्या या शाळेला आज 155 वर्षे झाली असून आजही ही शाळा मजबूटपणे उभी आहे. प्रभू राम गणेश गडकरी तसेच अनेक मान्यवरांनी शिक्षण घेतलेली ही शाळा असल्याने या शाळेचा उल्लेख गौरवाने घेतला जातो. रायगड जिल्हा परिषदेची ही शाळा कार्यालयीन कामकाजात कर्जत तालुक्याची सर्वात महत्वाची शाळा म्हणून ओळखली जाते.
या शाळेत आठ वर्ग खोल्या असून कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठ भागात ही शाळा असल्याने मागील काही वर्षापर्यंत या शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी असायची. मात्र इंग्रजी माध्यमांचे फॅड निघाले आणि भाषाप्रभू यांचे शिक्षण झालेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येला गळती लागली आहे.आज पहिली ते सातवी पर्यंत वर्ग मंजूर असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम 47 एवढी आहे.त्यात काही वर्गात तर चार पाच विद्यार्थी अशी विद्यार्थी संख्या आहे.त्यामुळे ऐतिहासिक आणि 155 वर जुनी शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या शाळेत जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्याकडून तीन शिक्षक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
या शाळेत 1895 ते 1897 या दोन वर्षात भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांनी शिक्षण घेतले आहे.दुसरी आणि तिसरी पर्यंतचे शिक्षण गडकरी यांनी आपल्या सांगवी गावातून येऊन पूर्ण केले होते.या शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर राम गणेश गडकरी यांचे सांगवी हे गाव आहे.तर याच शाळेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी काही महिने शिक्षण घेतले होते.तर साहित्यिक र.वा.दिघे यांचे वडील मोठे महसूल अधिकारी होते आणि त्यामुळे कर्जत येथे ते काही काळ सेवेत असल्याने र.वा.दिघे यांनी देखील शिक्षण घेतलेली जीवन शिक्षण मंदिर ही शाळा आहे.
आमच्यासाठी अशा ऐतिहासिक शाळा टिकवणे हे महत्वाचे काम असून या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दुप्पट करण्यासाठी माझ्या शिक्षण विभागाचा प्रयत्न राहणार आहे.पुढील वर्षी या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या 100चे घरात नेण्यासाठी शिक्षण विभाग नियोजनबद्ध काम करेल.त्यासाठी शहरातील वस्ती चाळी आणि झोपडपट्टी मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे धोरण आम्ही यशस्वी करू.मात्र महाराष्ट्रातील ज्येष्ठ मान्यवर यांनी शिक्षण घेतलेली शाळा बंद पडू देणार नाही.