आरोग्यम् धनसंपदा; आरोग्य योजनांचे लाभ मिळणार खासगी रुग्णालयात
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजना संयुक्त पद्धतीने इन्शुरन्स व ॲशुरन्स मोडवर एकत्रितपणे राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी यांना प्रतिकुटुंब, रु. 5 लाख रुपये , प्रतिवर्ष आरोग्य विमा शासनाकडून देण्यात येतो. तसेच योजनेंतर्गत आयुष्यमान कार्ड अथवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्ड धारक हे योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या शासकिय व खाजगी मानांकित रुग्णालयात दाखल झाल्यास त्यांना लाभ घेता येतो.
या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य योजनेचा लाभ व्यापक स्तरावर नागरिकांना प्राप्त होण्याकरीता जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयात हा लाभ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 30 रूग्ण खाटांपेक्षा जास्त क्षमता असलेल्या नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांनी या योजनेंतर्गत अंगीकृत असणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई मनपा कार्यक्षेत्रातील अशा मोठ्या क्षमतेच्या 38 खाजगी रुग्णालयांपैकी 11 रुग्णालये अंगीकृत झालेली असल्याने त्याठिकाणी या योजनेची अंमलबजावणी होत आहे. तसेच उर्वरित 27 खाजगी रुग्णालये यांनादेखील या योजनेत सामील करुन घेऊन अंगीकृत करण्याविषयी नमुंमपा मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नमुंमपा क्षेत्रातील 30 खाटांपेक्षा जास्त क्षमता असलेल्या नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीमध्ये योजनेविषयी जिल्हा समन्वयक यांचेमार्फत अंगीकृत प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली तसेच योजनेत सहभागी होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीमध्ये आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या सर्वसाधारण माणसाला आरोग्यविषयक दिलासा देणा-या योजना असल्याचे स्पष्ट करीत सरकारच्या अपेक्षेनुसार या योजनेसाठी पात्र सर्व रूग्णालयांनी आपल्या रूग्णालयांमध्ये या योजनांची अंमलबजावणी त्वरित सुरू करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. या योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणेकरिता उर्वरित 27 रुग्णालयांनी माहे मार्च 2025 पर्यंत योजना अंगीकृत करण्याची कार्यप्रणाली पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देशित केले. त्याचप्रमाणे आरोग्य विभाग आणि योजनेच्या जिल्हा समन्वयक यांचेमार्फत खाजगी रुग्णालय प्रमुखांना याविषयी मार्गदर्शन करण्याच्या व या प्रक्रियेत त्यांना काही अडचणी असतील तर त्याचे निराकरण तत्परतेने करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
या योजननांतर्गत आयुष्यमान कार्ड एमजेपीजेवाय कार्ड तयार करून घेण्याकरिता व्यापक स्तरावर मोहिमेच्या स्वरूपात जनजागृती करावी असे निर्देश देतानाच आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनांतर्गत रू. 5 लक्ष प्रति कुटुंब प्रतिवर्षासाठी आरोग्य विमा लाभ घेण्याकरिता नागरिकांनी शासनाचे संकेतस्थळ https://setu.pmjay.gov.in/setu/ तसेच https://beneficiary.nha.gov.in या वर पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नमुंमपा आरोग्य विभागाप्रमाणेच खाजगी रूग्णालयांनीही सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.