
Raigad News: अपघातग्रस्त टँकरमधून वायूगळतीची भीती; संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलिसांनी घेतली तज्ज्ञांची मदत
प्रोपिलीन हा अत्यंत ज्वलनशील व धोकादायक वायू असल्याने अपघातग्रस्त टँकरमधून गळती झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रूपाली दरेकर यांनी खालापूर येथील हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि रसायनी मोहोपाडा येथील धनंजय गीध यांच्याशी तातडीने संपर्क साधला. अशा प्रकारच्या धोकादायक वायूची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, घटनास्थळावरील नागरिक व बचाव पथकांची सुरक्षितता कशी सुनिश्चित करावी आणि संभाव्य वायूगळतीच्या परिस्थितीत कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, याबाबत त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन घेतले. (फोटो सौजन्य – AI Created)
या चर्चेदरम्यान टँकरपासून सुरक्षित अंतर राखणे, घटनास्थळी अनावश्यक गर्दी होऊ न देणे, परिसरातील नागरिकांना धोक्याच्या क्षेत्रापासून दूर ठेवणे, आग किंवा ठिणगी निर्माण होऊ शकणाऱ्या बाबींवर नियंत्रण ठेवणे तसेच आवश्यकतेनुसार अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची मदत घेणे अशा महत्त्वपूर्ण उपाययोजनांवर भर देण्यात आला. हेल्प फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षित हाताळणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. पोलीस प्रशासनानेही या सूचनांचा विचार करून घटनास्थळावरील परिस्थिती हाताळताना आवश्यक ती खबरदारी घेतली.
या घटनेतील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे अपघातानंतर निर्माण होऊ शकणारा दुय्यम धोका पोलीस प्रशासनाने वेळीच ओळखला. केवळ अपघातातील जखमींना मदत करण्यापुरते मर्यादित न राहता संभाव्य वायूगळतीमुळे उद्भवू शकणारी आणखी मोठी दुर्घटना रोखण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. पोलीस प्रशासनाची सतर्कता आणि हेल्प फाउंडेशनचे मार्गदर्शन यांचा समन्वय या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. संकटकाळात प्रशासन आणि सामाजिक संस्थांमध्ये योग्य समन्वय असेल, तर मोठ्या संभाव्य दुर्घटनेचा धोका कमी करण्यास निश्चितच मदत होते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.