
Raigad News: शेतकऱ्यांसोबत बांधावर घेतला भाकरी-पिठल्याचा घास, दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा; भरतशेठ गोगावले महाड दौऱ्यावर
पालकमंत्री गोगावले यांच्या संकल्पनेतून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या तत्त्वावर महाड तालुक्यात वनराई बंधारा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, श्रमदानातून जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहत आहे. याच अभियानांतर्गत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह मोहोत्रे, दहीवड आणि वडवली येथील वनराई बंधाऱ्यांची पाहणी केली. या दौऱ्यात जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रांताधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे आदी उपस्थित होते. (फोटो सौजन्य – AI Created)
मोहोद्रे गावाच्या हद्दीत गांधारी नदीवर उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात सुमारे दोन किलोमीटरपर्यंत पाणीसाठा निर्माण झाला आहे. बंधाऱ्याची उंची आणखी एक फूट वाढवून सांडव्याचे योग्य नियोजन केल्यास एप्रिल-मे महिन्यातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध राहू शकतो, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
या बंधाऱ्याला भविष्यात कायमस्वरूपी पक्के स्वरूप देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या. त्यामुळे भरतीच्या वेळी नदीत येणारे खारे पाणी रोखण्यासही मदत होणार आहे. पंचायत समितीचे उपसभापती सुरेश महाडिक यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारलेल्या या बंधाऱ्याचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. महाड औद्योगिक क्षेत्राजवळील दहिवड गावानजीक काळ नदीवर उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याचीही पाहणी करण्यात आली.
महाड तालुक्यात आतापर्यंत सुमारे ३० ते ४० वनराई बंधारे उभारण्यात आले असून, महाड-पोलादपूर परिसरातील एकूण संख्या ८७ असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नाल्याचे खोलीकरण करून पावसाचे पाणी अडविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि लोकसहभागातून जलसंधारणाची कामे वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
Amravati News: रुग्णसेवेवर राजकीय सावट! रुग्णांची परवड; आमदार निधीतील रुग्णवाहिकेला ‘ब्रेक’
दरम्यान, शेतक-यांच्या बांधावर घेतलेल्या भाकरी-पिठल्याच्या भोजनातून पालकमंत्र्यांनी शेतकऱ्याशी आपुलकीचा संवाद साधला. शेतकऱ्याच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना काम उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.