इतरांच्या भिंतींना कान असेल मात्र 'या' शाळेच्या भिंतीत ज्ञान दडलंय
संदिप जाबडे/ पोलादपूर: रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्ले या शाळेत बहुतांशी आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र घरी गेल्यावर सुशिक्षित पालक वर्ग नसल्याने शाळेत केलेल्या अभ्यासाची उजळणी घरी होत नाही. मात्र आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणात रमून रहावे शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून आदिवासी विद्यार्थी राहत असलेल्या आदिवासी वाडीतील समाज मंदिराला विद्येचा दालन बनवण्याचं काम पार्ले शाळेचे मुख्याध्यापक विठोबा रेणोसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केल आहे.
रायगड जिल्हा परिषद शाळा पार्ले या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण चांगले मिळावं यासाठी निपूण महाराष्ट्र या अभियानांर्तगत सारे शिकूया, महाराष्ट्र घडवूया हा उपक्रम पार्ले आदिवासीवाडी येथे सुरु केला आहे . सदर उपक्रमाचे उदघाटन रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाला नायब तहसिलदार पाटील, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, महसूल अधिकारी जाधव, ग्रामपंचायत अधिकारी विनय पाचडकर, उपतालुकाप्रमुख सुरेंद्र बांदल, विभाग प्रमुख अनिल भिलारे, सरपंच आशा पवार,आदिवासी संघटना अध्यक्ष पांडूरंग वाघे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे पहिली ते पाचवी पर्यंतच्या विदयार्थांचा शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी मराठी, गणित व इंग्रजी या विषयाचे शैक्षणिक साहित्य हे समाजमंदीराच्या भिंतींवर तयार करण्यात आले आहे . विद्यार्थी आपल्या सवडीनुसार कधीही जाऊन मित्राच्या, शिक्षण दूतांचा सहाय्याने शिकत असतो. नैसर्गिक शाळा बंद असते तेव्हा हा उपक्रम चालू असतो. या उपक्रमामुळे समाज मंदिराचे विद्यामंदीरात रुपांतर झाले आहे.
Uddhav Thackeay News: शेतकरी कर्जमाफीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा; उद्धव ठाकरेंची मागणी
आदिवासी विद्यार्थ्यांनी शिकून डॉक्टर, वकील, कलेक्टर व्हावं. यासाठी उच्च शिक्षण घेणं फार महत्त्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातून मागासलेल्या जातींना आरक्षण दिले. त्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला केला. मात्र आपण उच्च पदस्थ झाल्यावर मूळ गावाला वाडीला वस्तीला विसरता कामा नये असे मत उद्घाटक चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केले. तालुक्यात असणाऱ्या २३ आदिवासी वाड्यांपैकी सर्वात स्वच्छ आणि प्रगत आदिवासी वाडी ही पार्ले गावची आहे. पार्ले आदिवासीवाडीचा उर्वरित विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून लवकरच पूर्ण करू. तसेच पार्ले गाव हे आमच्या सर्वात आवडीचे गाव आहे कारण या गावापासूनच पोलादपूर तालुक्याची सुरुवात होते. त्यामुळे पार्ले गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्याला यश नक्कीच मिळेल अशी सुतवाल देखील यावेळी कळंबे यांनी काढले.