पेण : तालुक्यात बेकायदा खनिजांची वाहतूक बंद व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दुरशेत गावात अवैद्य गौण खनिजांची वाहतूक होत असल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे. भितीच्या वातावरणात जगत असलेल्या या गावकऱ्यांच्या म्हणण्याची प्रशासनाने दखल घ्यावी याकरिता पाण्यात उतरुन आंदोलन करण्यात येत आहे. येत्या मंगळवारी बैठक घेण्यात येईल व तोपर्यंत दुरशेत रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद राहील. उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. मागील २ वर्षांपासून पेण तालुक्यातील दुरशेत ग्रामस्थ अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या दहशतीखाली वावरत असताना वारंवार प्रशासनाला विनंत्या-अर्ज करुन देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा निषेध आणि भयमुक्त रस्त्याच्या मागणीसाठी दुरशेत ग्रामस्थांनी मागील महिन्यात दुरशेत फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी तहसीलदार पेण यांनी दुरशेत ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य पुढील पंधरा दिवसात दगड खान मालकांना त्यांच्या स्वतंत्र रस्ता बनवण्यासंबंधीचे पत्र काढले आहे.
मात्र एक महिना उलटूनही पर्यायी रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली नाही याउलट ग्रामस्थांना विश्वासात न घेता बाळगंगा नदीत जे एस डब्ल्यू चा प्रदूषणकारी स्लॅगचा भराव करून आधीच पूरग्रस्त असलेल्या दुरशेत गावाला दगडखान मालकांकडून पाण्यात बुडवन्याचा प्रयत्न होत असताना तहसीलदार किंवा महसूल अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप न केल्यामुळे आधीच जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या दूरशेत ग्रामस्थांनी अवैद्य गौण खनिज वाहतूक बंद करून भयमुक्त रस्त्यासाठी उदय गावंड, मिलिंद गावंड, अजय भोईर, जयेश म्हात्रे, नितेश डंगर या तरुणांच्या नेतृत्वाखाली दुरशेत ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन केल्यानंतर अखेर उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलन स्थळी भेट देत आंदोलन कर्त्यांना विश्वासात घेऊन येत्या मंगळवारी 22 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात दुरशेत ग्रामस्थांसोबत बैठक घेण्यात येईल व तोपर्यंत अवैद्य अवजड वाहतूक बंद राहील असे आश्वासन दिल्यानंतर मंगळवार पर्यंत ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.
या आंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यांसह सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, डॉ. वैशाली पाटील, प्रसाद भोईर (रायगड जिल्हा प्रमुख उबाठा)संदीप ठाकूर (मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष), देविदास पाटील, मोहिनी गोरे, महेश पाटील, राजू पाटील, राजेश रसाळ, सचिन पाटील, मानसी पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.