फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील पुलाचीवाडी परिसरामध्ये सध्या बिबट्याचा आणि त्याच्या बछड्यांचा मुक्तपणे वावर दिसून येत आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेमध्ये, शेतकरी विनायक दोधाड यांनी आपल्या घरातून मोबाईल कॅमेर्याच्या सहाय्याने दोन बिबट्याच्या बछड्यांचा व्हिडिओ कैद केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. १३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुलाचीवाडी शिवारात दोन बिबट्याचे बछडे शेतात मुक्तपणे खेळताना दिसून आले. हा थरारक व्हिडीओ विनायक दोधाड यांनी आपल्या घरातूनच मोबाईलमध्ये टिपला. या व्हिडिओमुळे बिबट्यांचा वावर पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. मागील दीड महिन्यापासून या परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याचे बोलले जात होते, परंतु या व्हिडिओने त्या संशयावर शिक्कामोर्तब केले आहे.
पुलाचीवाडी, पळसुंडे आणि निकमवाडी परिसरात घनदाट जंगल आणि झाडे-झुडपांनी व्यापलेला परिसर असल्यामुळे बिबट्यांसाठी हे अनुकूल ठिकाण आहे. पळसुंडे येथील आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी रोज पायवाटेने, दाट झाडीतून चालत शाळेत ये-जा करतात. यामुळे त्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी शेतात एकटेच काम करत असल्यामुळे त्यांनाही भीती वाटू लागली आहे.
विनायक दोधाड यांनी सांगितले की, “बिबट्याचे बछडे आमच्या घराजवळ खेळत असताना मी भीतीने व्हिडिओ काढला. बिबट्याने आधी आमच्या गावात कुत्रे, बकऱ्या, कोंबड्यांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत आहेत. वनविभागाने तात्काळ उपाययोजना करावी.”
परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे मागणी केली आहे की, बिबट्या व त्याच्या बछड्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे जीव वाचू शकतील. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करणे ही काळाची गरज झाली आहे. ही घटना वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.