Raigad News: तळा नगरपंचायतीत सत्ताधारी आघाडीत धुसफूस! विकासकामांना हिरवा कंदील, ठरावाला मात्र लाल सिग्नल
दुसरीकडे मुख्याधिकारी मनिषा वजाळे, भाजपच्या नगरसेविका तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नगरसेवक गैरहजर राहिल्याने सभा सुरू होण्याआधीच ‘खेळ खल्लास’ झाला आणि सभा तहकूब करण्याची वेळ आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी रंगली. विकासकामांच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. (फोटो सौजन्य – AI Created)
दरम्यान, सर्वसाधारण सभेलाच सत्ताधारी गटातील नगरसेवक गैरहजर राहिल्याने तळा नगरपंचायतीतील सत्तेचा ताळमेळ नेमका कुठे बिघडला आहे? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. शहराच्या विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असताना, कामांना ठरावाची वाट दाखवायची की राजकीय कुरघोडीची यावर तळ्याच्या विकासाचा गाडा अडकणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. एकूणच, तळा नगरपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली सुरू झालेला राजकीय ‘सामना’ सध्या चांगलाच रंगला असून, मंजूर कामांना ठराव कधी मिळणार आणि सत्ताधारी आघाडीतील हा वाद कुठपर्यंत जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेच्या नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, शहरासाठी तब्बल २ कोटी ९५ लाख रुपयांची कामे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, ही कामे मंजूर होऊनही त्यांना आवश्यक ठराव देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. म्हणजे एकीकडे विकासकामांना मंजुरीचा ‘हिरवा कंदील’, पण दुसरीकडे ठरावाच्या फाईलला मात्र ‘लाल सिग्नल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला.






