
Raigad News: मोदींचा दौरा रद्द, पण खोदलेला रस्ता तसाच! संतप्त ग्रामस्थांनी रोखले प्रकल्पाचे काम, नेमकं काय घडलं?
टोरंट प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिपॅड ते कार्यक्रम स्थळापर्यंत जाण्यासाठी रस्ता अत्यंत खराब असल्याने, सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर रस्ता नव्याने करण्यासाठी निविदा काढली होती. टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच कंत्राटदाराने संपूर्ण रस्ता खोदून ठेवला. मात्र त्यानंतर मागील महिनाभरात त्या खोदलेल्या रस्त्यावर कोणतेही काम झाले नाही. यामुळे सावळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, “आमचे रस्ते पूर्ववत करून द्या आणि त्यानंतरच प्रकल्पस्थळी सपाटीकरणाचे काम सुरू ठेवा”, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. (फोटो सौजन्य – AI Created)
या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल देवांग यांनी सांगितले की, “त्या रस्त्याच्या कामाला साडेतीन लाखाचा निधी मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन दिवसांत ठेकेदार कंपनी निश्चित होईल आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल.”
या आंदोलनात बाजीराव दळवी, भरत दळवी, भास्कर दळवी, मोहन काशिनाथ धुळे, रोहिदास धुळे, अशोक माळी, सखाराम धुळे, पांडुरंग धुळे, कृष्णा मोडक, संदीप मोडक, सागर दळवी, संदीप मोतीराम धुळे, राजेश जोशी, बळीराम दळवी, सचिन मोडक, लक्ष्मण धुळे, संभाजी धुळे, सचिन विष्णू धुळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही, पण आमचा वाद खोदलेल्या रस्त्याबाबत आहे. सावळे फाटा ते कमान हा रस्ता तातडीने तयार करून द्यावा, तरच इकडे प्रकल्पाचे काम सुरू करू दिले जाईल. – बाजीराव दळवी, स्थानिक ग्रामस्थ
रस्त्यांची दुरवस्थाः “रस्त्याचे काम मंजूर नसताना तो आधीच का खोदला? या खोदलेल्या रस्त्यावरून घसरून अनेक जण दुचाकीवरून पहले असून महिलाही जखमी झाल्या आहेत”, असा संताप ग्रामस्थ अशोक माळी व रोहिदास धुळे यांनी व्यक्त केला. आमच्या गावातून जाणारा चांगला काँक्रीटचा रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
पोलिसांची मध्यस्थीः घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी, “सरकारी कामात अडथळा आणू नका, सुरक्षेचा प्रश्न पाहता आपले आंदोलन बाहेर जाऊन करा”, अशी सूचना ग्रामस्थांना केली.