राज्याच्या राजकारणात गेले काही दिवस महत्वाच्या घडामोडी घडताना दिसून येत आहे. मराठी भाषेवरून निर्माण झालेल्या वादावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ तब्बल अनेक वर्षांनी एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान निवडणुकीत देखील दोन्ही भाऊ एकत्रित येणार असे चित्र सध्या निर्माणझाले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दरम्यान दोन्ही भाऊ एकत्रित आल्यास फायदा होणार का हे बेस्ट (BEST) एम्प्लॉयी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीतून कळणार आहे. या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढले आहेत.
बेस्ट (BEST) एम्प्लॉयी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीतील एक विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा पक्ष एकत्रितपणे लढला आहे. त्यामुळे उद्या जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मनसे आणि युबीटी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उत्कर्ष नावाचे पॅनल या निवडणुकीत उभे केले आहे. याद्वारे त्यांनी २१ उमेदवार उभे केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने १८, राज ठाकरे यांच्या पक्षाने २ तर एक उमेदवार अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती संघाचा होता. या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.
ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना युबीटी आणि राज ठाकरे यांच्या मनसे यांच्यातील युतीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, उद्धव गटाने असेही म्हटले आहे की, दोन्ही भाऊ येत्या महानगरपालिका (BMC)निवडणुकीत एकत्र लढतील.मात्र अद्याप दोन्ही बाजूंनी कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही.
दुसरीकडे, शिवसेना युबीटीचे राज्यसभा खासदार संजय राऊत शुक्रवारी म्हणाले की, “ठाकरे बंधू एकत्र नगरपालिका निवडणुका लढतील आणि जिंकतील. मुंबई, ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक महानगरपालिकांसाठी आधीच चर्चा सुरू आहे. आता कोणतीही वाईट शक्ती ठाकरे कुटुंबाची एकता तोडू शकत नाही.”
मनसेने आतापर्यंत लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकलेली नाही. २००९ मध्ये मनसेने १३ जागा आणि ५.७% मते जिंकत राज्य विधानसभा निवडणुकीत चांगली सुरुवात केली होती, परंतु तेव्हापासून त्यांचे नशीब ढासळले आहे… २०१४ आणि २०१९ मध्ये प्रत्येकी फक्त एक जागा जिंकली आणि २०२४ मध्ये ती शून्यावर आली. महत्त्वाचे म्हणजे मनसेने आतापर्यंत लढवलेल्या तीन महानगरपालिका निवडणुकांमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे, शहरी मराठी मतदार राज यांच्या प्रादेशिक ओळखीच्या आग्रहाला प्रतिसाद देत आहेत आणि यामुळे शिवसेनेच्या (यूबीटी) शक्यता वाढू शकतात.