Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक कंपन्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. काही एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला तर काही पोलनुसार महाविकास आघाडीला यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र लढत ही अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यामुळे कदाचित या निवडणुकीत राज ठाकरे हे महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले. तसेच मनसेच्या मदतीने भाजपचा मुख्यमंत्री होईल अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते. सध्या समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा किंगमेकर होण्याची शक्यता आहे.
मनसेने 128 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यामुळे काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीला नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर एका मुलाखतीमध्ये यावेळेस भाजपचा मुख्यमंत्री तर 2029 मध्ये मनसेचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केले होते. सध्या समोर आलेल्या एक्झिट पोल नुसार महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यावेळेस कोणालाच बहुमत मिळाले नाही तर मनसे महत्वाची भूमिका बजावू शकते. महायुतीला सत्ता स्थापन करण्यासाठी मनसेची मदत घ्यावी लागणार का हे आता येत्या 23 तारखेलाच कळणार आहे.
पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 77 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला 37 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसला 18 ते 30 जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत कॉँग्रेसला 28 ते 47 जागा मिळू शकतात. ठाकरेंच्या शिवसेनेला 16 ते 35 तर शरद पवार यांच्या पक्षाला 25 ते 39 जागा मिळू शकतात.
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येत असल्याचे दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 150 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर 6 ते 8 जागांवर अपक्ष उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, हा अंदाज चाणक्य एक्झिट पोलने दिलेला आहे.
पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येताना दिसत आहे. महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यात अपयश दिसत आहे. पीपल्स प्लसच्या अंदाजानुसार राज्यात महायुतील 182 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी शंभरी देखील पार करू शकत नाही असे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीला विधानसभेत केवळ 97 जागा मिळतील असा अंदाज पीपल्स पल्सने व्यक्त केला आहे.