रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं आज पुण्यात (Pune) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजकीय नेत्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Tweet About Vikram Gokhale) यांनी ट्वीट करत विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी विक्रम गोखले यांचा फोटो शेअर करत त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ कलावंत विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन.#विक्रमगोखले #VikramGokhale pic.twitter.com/Mcv0GmHhEW
— Raj Thackeray (@RajThackeray) November 26, 2022
गेले काही दिवस विक्रम गोखले यांची प्रकृती नाजूक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर ट्विटरवर राज ठाकरे म्हणतात की, “मुळात रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळच. त्यात अनेकदा असं जाणवत आलंय की अनेक अभिनेते तिन्ही माध्यमात उत्तम अभिनय करत असले तरी त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय कुठल्यातरी एका प्रकारात खुलतो. पण विक्रम गोखले हे त्याला दुर्मिळ अपवाद होते. तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच. त्यांची संवादफेक उत्तम होतीच, पण चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातूनदेखील बोलण्याची त्यांची हातोटी कमाल होती. तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आणि तो ही उत्तम अभिनयाचा वारसा घेऊन ह्या क्षेत्रात उतरायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हे कठीण असतं, पण विक्रम गोखलेंना ते सहज पेललं. मला अजून एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे. ते म्हणजे राजकीय भूमिका घेताना कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. त्यांच्या सर्वच भूमिका काही मला मान्य होत्या असं नाही, पण किमान ते भूमिका घ्यायचे हे विसरता येणार नाही. भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत आज आपल्यातून निघून गेला. विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन – राज ठाकरे”.