
कट्टर राजकीय वैर विसरून ‘चाय पे चर्चा’; इंदापुरात राजू शेट्टी-सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र
एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘जिवलग मित्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षांत तीव्र राजकीय मतभेद झाले. सभांमधून एकमेकांवर टीका करणारे हे नेते आता मात्र एका टेबलावर बसून चहाचा आस्वाद घेत जुन्या आठवणींमध्ये रमल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे “राजकारण वेगळं… पण मैत्री कायम!” अशी चर्चा इंदापुरात रंगली आहे.
२०११ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान दोन्ही नेत्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांप्रकरणी इंदापूर न्यायालयात खटला सुरू आहे. त्याच खटल्याच्या तारखेनिमित्त दोघे नेते पुन्हा एकत्र न्यायालयात उपस्थित राहिले. विशेष म्हणजे, यापूर्वी न्यायालयात भेट झाल्यावर एकमेकांकडे पाहणेही टाळणारे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यावेळी मात्र दिलखुलास गप्पा मारताना दिसले.
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघांनीही एकत्र बसून ‘चाय पे चर्चा’ केली. आंदोलनाच्या दिवसांच्या आठवणी, संघर्षाचा काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झालेल्या चर्चेमुळे वातावरण काही काळ भावनिकही झाले. “आंदोलनाच्या काळात आम्ही एकत्र होतो. खटला एकच असल्याने आज भेट झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही आजही एक आहोत,” अशी प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांनी दिली. राजकीयदृष्ट्या दोन ध्रुवांवर उभे असलेले हे नेते चहाच्या निमित्ताने का होईना पुन्हा एकत्र आल्याने इंदापूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
शेतकऱ्यांमध्ये नवी आशा निर्माण
सध्या राज्यात ऊस दराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत असून आगामी साखर हंगामही तोंडावर आला आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या काळात महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील हे दोन आक्रमक नेते एकत्र चहा घेताना दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे. या भेटीमुळे आगामी काळात राज्यातील शेतकरी आंदोलनाला नवी धार मिळणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.