'ठाकरे बंधुंनी हिंदीविरोधी भूमिका घेणं योग्य नाही, मराठी भाषा ही आमची...': रामदास आठवलेंली प्रतिक्रिया
महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये पहिल्यापासून त्रिभाषा सूत्र राबवण्याचा घेतलेला निर्णय सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; प्रकाश आंबेडकरांनी घेतला ‘हा’ निर्णय
रामदास आठवले म्हणाले, “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही. त्रिभाषा सूत्रामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांचा समावेश असणे गरजेचे आहे. मराठी ही आमची मातृभाषा आहेच आणि तिचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, इंग्रजी व हिंदी भाषांचे ज्ञानही आजच्या काळात अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये सर्व विषय मराठीतच शिकवण्याचा काही आदेश सरकारने दिलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “राज आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदीविरोधी भूमिका घेणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांशी विसंगत आहे. राज्य सरकारने अशा दबावात न येता योग्य निर्णय घ्यावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योग्य भूमिका अपेक्षित असून, आमचा पाठिंबा त्यांना आहे.”
रामदास आठवले यांनी असंही नमूद केलं की, “मराठी हा आमचा अभिमानाचा विषय आहेच, पण महाराष्ट्राबाहेर हिंदी ही संवादाची गरज असते. मुंबईसारख्या बहुभाषिक शहरातही अनेकजण मराठीत बोलताना दिसतात, ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, हिंदीचा अवमान होणे योग्य नाही. इंग्रजीचे महत्त्वही नाकारता येत नाही, विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर.”अखेर आठवले यांनी सांगितलं, “आपण मराठी माणसं असलो तरी राष्ट्रभाषेचा सन्मान राखणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे.”