नागपूर : राष्ट्रीय संस्थात्मक मानांकने आराखड्यांतर्गत (एनआयआरएफ) देशातील शिक्षणसंस्थाचे मानांकन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सोमवारी जाहीर केले. त्यात राष्ट्रीय स्तरावरील 200 विद्यापीठांमधून नागपूर विद्यापीठाला 196 वे स्थान मिळाले. विद्यापीठ गेल्या वर्षीही याच स्थानावर होते. स्थापनेचा शताब्दी महोत्सव साजरा करणाऱ्या नागपूर विद्यापीठाकडून (Nagpur Univercity) शिक्षणाचा स्तर आणि संशोधनाच्या गुणवत्तेत सुधार करण्याचा दावा केला जातो. केंद्रीय मानांकनातून दाव्यातील फोलपणा अधोरेखित झाला आहे. यंदा व्हीएनआयटीचाही नंबर घसरला आहे.
शिक्षण संस्थांमधील शिक्षण, संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण 13 श्रेणींमध्ये हे मानांकन देण्यात आले आहे. मानांकन यादीतील वेगवेगळ्या श्रेणीमध्ये नागपूर विभागातील काही संस्थांचे मानांकन सुधारले आणि काही श्रेणीत घसरले आहे. देशातील सर्वोत्कृष्ठ समग्र संस्थांच्या यादीत विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेचे (व्हीएनआयटी) रॅकिंग घसरले असून संस्थेला 82 व्या स्थानावर आहे.
शासकीय विज्ञान संस्था 83 व्या क्रमांकावर
व्यवस्थापन संस्थांना रँकिंगमध्ये नागपूरच्या इंडियन इनस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने 43 वे स्थान प्राप्त केले आहे. गेल्या वर्षीही संस्था याच स्थानावर होती. महाविद्यालयाच्या रँकिंगमध्ये नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्थेने 83 व्या स्थानावर झेप घेतली आहे. नागपूर विद्यापीठासाठी दिलासादायक बाब म्हणजे औषधीशास्त्र अभ्यासक्रमाच्या यादीत विद्यापीठाच्या औषधीशास्त्र विभागाला 51 वे स्थान मिळाले आहे.
शासकीय दंत महाविद्यालय 15 व्या स्थानी
कामठीतील फार्मसी कॉलेज 68 व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी 53 वर होते. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रॅकिंगमध्ये जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने सुधारणेसह 161 वे स्थान गाठले. दंत महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये शासकीय दंत महाविद्यालय 15 व्या स्थानी आहे.