परशुराम एज्युकेशन सोसायटीचा आगळावेगळा रक्षाबंधन उपक्रम, चानून तुम्हालाही अभिमान वाटेल
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील परशुराम एज्युकेशन सोसायटीने देशभक्ती जागवणारा एक आगळावेगळा उपक्रम राबवला. ‘एक राखी, एक देश’ या संकल्पनेवर आधारित उपक्रमात युनायटेड इंग्लिश स्कूल आणि सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या देशभरातील जवानांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट ऑफिसपर्यंत रॅली काढली.
या उपक्रमाची सुरुवात युनायटेड इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांच्या हस्ते सरस्वती व मातृ पूजनाने झाली. दहावीच्या रुद्र बांडागळे याने गाऱ्हाणं घालून रॅलीची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेत देशभक्तिपर घोषणांनी संपूर्ण मार्ग दुमदुमवला. “वंदे मातरम्”, “भारत माता की जय” असे गगनभेदी जयघोष करत रॅली युनायटेड स्कूल ते चिपळूण पोस्ट ऑफिस मार्गावरून निघाली.
..तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचलो असतो; ठाकरेंचे अरविंद सावंत संसदेत कडाडले
विशेष म्हणजे युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या १८ विद्यार्थ्यांचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांसाठी खास राख्या तयार करून त्यांच्या युनिटच्या पत्त्यावर पाठवल्या. ही राखी केवळ बंधाचे प्रतीक नव्हे, तर शूर सैनिकांसाठी मनोबल वाढवणारी ठरली.
पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्यावर महिला शिक्षकांनी पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, मुख्याधिकारी विशाल भोसले, नायब तहसीलदार मोरे, उद्यानप्रमुख बापू साडविलकर, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांची उपस्थिती होती. यांच्याच हस्ते सैनिकांसाठी तयार करण्यात आलेल्या राख्यांचे पाकिटे पोस्टमास्तर श्रीमती जोशी व अधिकारी कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजवण्यासाठी उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. “राखी केवळ बंधाचा उत्सव नसून ती सुरक्षा आणि सन्मानाचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, प्रेमजीभाई आसर स्कूलच्या नाईक, गद्रे स्कूलच्या यशोदे, गोरीवले, रानडे, पोटसुरे, शिक्षक संदीप मुंडेकर यांचाही मोलाचा सहभाग होता.
कार्यक्रमाचा समारोप वैशाली चितळे यांनी विद्यार्थ्यांसोबत राज्यगीत गाऊन केला. या अभिनव उपक्रमातून चिपळूणच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी सैनिकांपर्यंत प्रेम, सन्मान आणि देशभक्तीचा संदेश राखीच्या माध्यमातून पोहोचवला.