
फोटो सौजन्य: Gemini
हापूस आंबा म्हटले की, आपल्या कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट व सुवासिक आंबा आठवतो. केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील व प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलियातील खवय्यांना हापूसची गोडी लागली आहे. पण, याच कोकण हापूसवर आता गुजरातने दावा केला आहे. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केली जात आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.
Ratnagiri News : कोयना धरणाला गळती ? तीन महिने गावकऱ्यांवर पाणीटंचाईचं संकट
जगात कोकण हापूस, हे हापूस आंब्याला मिळालेले पहिले व एकमेव भौगोलिक मानांकन आहे. आंब्याचा हंगामात आणि खरेदी-विक्रीत हापूसचा बोलबाला जास्त असल्यामुळे त्यामुळे प्रत्येकाला हापूस मानांकन हवे आहे.
कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यादा शिवनेरी हापूस आंबा नावाने २०२२ मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला असून, त्यांच्याकडून कागदपत्रे सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.
२०२३ मध्ये गांधीनगरनवसारी विद्यापीठाने वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
त्या बाबतच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी झाली आहे. त्याला डॉ. विवेक भिडे यांनी कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष म्हणून कडाडून विरोध केला आहे. कोकण हापूसला २०१८ मध्ये मानांकन मिळाले.
समुद्रकिनाऱ्यावरील चार जिल्ह्यांत उत्पादित होणाऱ्या विशिष्ट आंब्यासाठी हे मानांकन आहे. या मानांकनामुळे कोकणातील हापूस उत्पादकांना सुरक्षित बाजारपेठेसह आर्थिक सुरक्षा मिळाली आहे.
मुळात कोकण हापूसमध्ये कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि महाराष्ट्रातील अन्य भागात उत्पादित होणाऱ्या आंब्याची भेसळ होते. ज्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. अस्सल कोकण हापूससाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. तरीही कोकण हापूसमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते आहे. आता वलसाड हापूसला मानांकन मिळाले तर कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, त्यामुळे आम्ही वसलाड हापूसला कायदेशीर विरोध करीत आहोत, अशी माहिती कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी दिली.