
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ६५ टक्के मतदान
मतदान सकाळपासूनच केंद्रांवर मतदारांची गर्दी
उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड या चार नगरपरिषदा तसेच देवरुख लांजा आणि गुहागर या तीन नगरपंचायतींसाठी आज सार्वत्रिक निवडणूक झाली. ही निवडणूक अत्यंत चुरसपूर्ण होतीच आणि अत्यंत शांततेतही पार पडली. या निवडणुकीत एक लाख ६० हजार ४५७ मतदारांना मतदानाचा अधिकार होता सायंकाळी मतदान संपल्यानंतर सुमारे ६५ ते ७० टक्के एवढे मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ५८.३१ टक्के एवढे मतदान झाले होते त्यामुळेच पुढील दोन तासात आणखी विक्रमी मतदान होण्याची शक्यता होते आणि मतदान केंद्रांमध्ये गर्दी ही दिसून येत होती त्यामुळेच ६५ ते ७० टक्के पर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. वाढलेल्या मतदान टक्क्याचा फायदा नक्की चर्चा सुरू झाली आहे. मात्र मतमोजणी ३ डिसेंबर ऐवजी आता २१ डिसेंबरला होणार असल्याने सर्वांनाच निकालाची आणखी अठरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वाढलेली टक्केवारी सत्तेसाठी टर्निंग पॉईंट?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बऱ्याच कालावधीनंतर होत असल्यामुळे पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदारांमध्येही मोठा उत्साह दिसून येत होता. मतदार मतदान केंद्रापर्यंत जावेत यासाठी कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन प्रयत्न केले जात होते त्यामुळेच सायंकाळी मतदान संपेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून आली. ज्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी त्याचा फायदा नेमका कोणत्या राजकीय पक्षाला किंवा कोणत्या उमेदवारांना मिळणार याबाबतची चर्चा नेहमीच केली जाते. मतदानाची वाढलेली टक्केवारी ही सत्तेसाठी टर्निंग पॉईट ठरू शकते, याबद्दलही चर्चेला उधाण आले होते.
मतदान सकाळपासूनच केंद्रांवर मतदारांची गर्दी
जिल्ह्यातील ४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी स. ७.३० वा. ते दु. ३.३० पर्यंत ८३ हजार २८३ मतदान झाले. एकूण २०० मतदान केंद्रावर १ लाख ६० हजार ४५७ मतदारांपैकी ८३ हजार २८३ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष ४० हजार ९०७, महिला ४२ हजार ३७४ तर इतर १ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. स. ७.३० ते साडेनऊ या पहिल्या टप्प्यात १४.२६ टक्के एवढे मतदान झाले. त्यानंतर ७.३० ते ११.३० पर्यंत मतदानाच्या टक्केवारी मध्ये वाढ होऊन ह टक्केवारी ३०. ८९ पर्यंत पोहोचली. दु. १. ३० पर्यंत मतदानाची टक्केवारी ४६.६४ पर्यंत पोहोचली. रत्नागिरी नगरपरिषदेसह जिल्ह्यातील राजापूर, चिपळूण, खेड नगरपरिषद तसेच देवरुख लांजा व गुहागर नगरपंचायत क्षेत्रात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती.