फोटो सौजन्य- सोशल मीडिया
रत्नागिरीमध्ये आज उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सभा घेतली यावेळी त्यांनी भाजप, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, नारायण राणे, उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सिंधुदुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मोदींच्या अशुभ हाताने उभा केला होता जो आठ महिन्यात कोसळला. या पुतळा पडल्यानंतर मोदींनी माफीही गुर्मीत मागितली होती. अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत केली.
शिंदे, सामंत बंधूवर घणाघात, साळवींचे कौतुक
खोकेबाजीचे राजकारण आता आपल्याला जाळून भस्म करायला हवे. असे म्हणत तसेच एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. दीड हजार रुपायांमध्ये घर चालतं का? असा सवाल त्यांनी लाडकी बहीण योजनवर उपस्थित केला. 2014 मध्ये मी निवडून येतो मला मंत्रीपद द्या तेव्हा मी उदय सामंत यांना शब्द दिला 2014 मध्ये त्यांना मंत्रीपद देऊ शकलो नाही. मात्र 2019 मध्ये मी त्यांना मंत्री केले. त्यांनी गद्दारी केली उद्योग मंत्री होऊनही किती उद्योग रत्नागिरीत आणले? हा प्रश्न उदय उपस्थित केला तर, राजन साळवींविरोधात उभे राहिलेल्या किरण सामंत यांना पैशाची मस्ती आहे अशी टीका त्यांनी किरण सामंत यांच्यावर केली. राजन साळवींवर दबाव असतानाही त्यांनी शिवसेना सोडली नाही. ते खरे निष्ठावंत आहेत.
कोरोनाच्या संकटामध्ये महाराष्ट्राला महाविकास आघाडी सरकारने सहीसलामत बाहेर काढल. महाराष्ट्राची जनता मला कुटुंब प्रमुख मानते. संपूर्ण देशामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडून दिला नाही. पण घर फोडणारे तुम्ही माझी, आपली शिवसेना फोडली, शरद पवारांचं घर फोडलं आणि राज्य करताय आणि आम्हाला तुम्ही सांगताय ही जनता आज पर्यंत माझ्यावरती प्रेम करत आहे तिचं प्रेम कधीच आटल असतं. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप केलात मला मान्य आहे. कारण मी ती परंपरा घेऊन पुढे जात आहे.
राज्यात मशाल धगधगताना दिसली पाहिजे
कोल्हापूरातील राधानगरीतही माझ्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. सगळीकडे मशाल पेटताना दिसत आहे. मला राज्यात मुंबईपासून संपूर्ण किनारपट्टीवरच नाही तर मला राज्यात मशाल धगधगताना दिसली पाहिजे. खोकेबाजीचा राजकारण आपल्याला आत्ताच जाळून भस्म करावे लागेल. असे आवाहन त्यांनी सभेला जमलेल्या जनसमुदायला केले.
रत्नागिरीमध्ये रत्नागिरी, दापोली, राजापूर आणि गुहागर या चार मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार हे शिंदे गटाविरुद्ध लढत आहेत. मागील लोकसभा निवडणूकीमध्ये कोकणातील दोन्ही जागा महायुतीने जिंकल्या होत्या. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील ही विधानसभा निवडणूकही शिवसेनेच्या दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली आहे.