अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुक काही महिन्यातच होणार आहे. राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच या योजनेवरुन अमरावतीतील आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
राणा नेमकं काय म्हणाले?
आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असे धक्कादायक वक्तव्य रवी राणांनी केलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमानपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला होता. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलंय. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं मतही रवी राणा यावेळी बोलतांना मांडले आहे.
लाडकी बहिण योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे, 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.