
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे उपस्थित होते. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांच्या वतीने या रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रंगीत तालीमदरम्यान झालेल्या संचलनात भारतीय नौदल, गोवा पोलीस, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, दंगल नियंत्रण पथक, महिला सशस्त्र पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-60 पथक, गृह रक्षक दल (पुरुष व महिला), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी (मुले व मुली), स्टुडंट पोलीस कॅडेट, भारत स्काऊट गाईड, तसेच विविध शाळांमधील रोड सेफ्टी पेट्रोल पथकांचा सहभाग होता.
याशिवाय पाईप बँड, महिला पाईप बँड, ब्रास बँड, अश्वदल पोलीस पथक, तसेच भारतीय नौदल, बृहन्मुंबई पोलीस, महिला निर्भया पथक आणि अग्निशमन दलाच्या वाहनांनी संचलनात सहभाग नोंदवला. या संचलनाचे नेतृत्व नौदल कमांडर पंकज बघेल यांनी केले.
BMC Mayoral Election: मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर; महायुतीमधील ‘हॉटेल डिप्लोमसी’
या रंगीत तालीममध्ये विविध शासकीय विभागांच्या चित्ररथांनीही सहभाग घेतला. यामध्ये अल्पसंख्याक विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता, मराठी भाषा, ग्रामविकास व पंचायतराज, सहकार व वस्त्रोद्योग, सार्वजनिक आरोग्य, कृषी, पर्यटन, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, आदिवासी विकास, अन्न व नागरी पुरवठा, इतर मागास बहुजन कल्याण, जलसंपदा, महावितरण, शिक्षण शाखा (वाहतूक, मुंबई), कौशल्य व रोजगार, गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण, कामगार विभाग आणि वन विभाग यांचा समावेश होता.
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या संचलनातील सर्वोत्कृष्ट पथकांना यावेळी पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. सशस्त्र दलांमध्ये राज्य राखीव पोलीस बलाने प्रथम, तर बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. निशस्त्र दलांमध्ये बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलाने प्रथम क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी भजक आणि पल्लवी मुजुमदार यांनी केले. तर किरण शिंदे, अरुण शिंदे, विवेक शिंदे आणि कु. आराध्या शिंदे यांनी सनई-चौघडा वादन सादर केले.