दादरच्या शिवाजी पार्कवर सभा घेताय? तर थांबा; आता भाड्यामध्ये लवकरच होणार वाढ
मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क मैदान चांगलेच प्रसिद्ध आहे. राजकीय पक्षांच्या सभा असो वा मेळावे वा अन्य कार्यक्रम या मैदानाला विशेष अशी ओळख आहे. या मैदानासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, अन्य सभा यांसाठी दिवसाला 250 रुपये एवढे नाममात्र शुल्क मुंबई महापालिकेकडून आकारले जाते. या शुल्कात वाढ करण्यासाठी मुंबई महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता लवकरच शुल्कवाढ दिसेल, असे सांगण्यात येत आहे.
हेदेखील वाचा : लाडकी बहीण योजना ठरतीये बेस्ट; आत्तापर्यंत 1.60 कोटी महिलांना मिळाला लाभ
सध्या राजकीय सभा, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शिवाजी पार्क मैदानातील जागा देताना मुंबई महापालिका दिवसाला अवघे 250 रुपये शुल्क अधिक जीएसटी एवढी रक्कम आकारते आणि 20 हजार रुपये अनामत रक्कम घेते. अत्यल्प शुल्क आणि डिपॉझिट पाहता ते वाढवण्याचा विचार केला जात आहे. प्रस्तावित भाडेवाढीबाबत योग्य ते धोरण निश्चित करावे, असेही जी विभागाने पत्रात नमूद केले आहे. याआधीही शिवाजी पार्क मैदानाचे शुल्क वाढवण्याबाबत विचार झाला होता. मात्र, नंतर तो मागे पडला.
दरम्यान, पालिकेच्या जी उत्तर विभागाने महापालिकेच्या मालमत्ता विभागाशी ऑगस्टमध्ये पत्रव्यवहार केला आहे. भाडेवाढीबाबत योग्य ते धोरणही निश्चित करण्यात यावे, असेही पत्रात नमूद केले आहे. शिवाजी पार्क मैदानात अनेक खेळपट्ट्या असून, क्रिकेटचा सराव आणि सामनेही येथे होतात.
मैदानात सभांसह फेरफटका मारण्यासाठीही गर्दी
फेरफटका मारण्यासाठीही अनेक जण पार्कात येतात. हे मैदान नेहमीच राजकीय सभांचे साक्षीदार राहिले आहे. येथे सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. सभांसाठी भल्या मोठ्या आकाराचे स्टेज उभारण्यासाठी मैदान खणले जाते. झेंडे, मोठे स्क्रीन बसवण्यासाठी बांबू लावण्यात येतात. मात्र, अनेकदा अशा सभांमुळे मैदानाची अवस्था खराब होते.
एक लाख किंवा अधिक अनामत रक्कम?
शिवाजी पार्क मैदानासाठी एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक अनामत रक्कम आकारण्यासंदर्भातही विचार आहे. सभा किवा कार्यक्रमांनंतर मैदानाच्या होणाऱ्या दुरावस्थेची वसुली काहीवेळा आयोजकांकडून अनामत रकमेमधूनच केली जाते. मात्र, ती अत्यल्पच असते. गेली अनेक वर्षे कमी असलेल्या शुल्कामुळे यामध्ये वाढ करण्याचा विचार केला जात आहे.
हेदेखील वाचा : राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रीय; मुंबई, ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज तर पुण्यात…