Pune Weather : पुणे शहरात तापमानात होतेय मोठी वाढ; कमाल तापमान 35 अंशांवर (फोटो - istock)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात पुणे शहरात कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. मंगळवारी (ता. २४) यामध्ये अधिक वाढ झाली. परिणामी, शहरात उन्हाचा चटका वाढला असून, पुणेकर उकाड्याने हैराण झाले. मात्र, पुढील तीन ते चार दिवसांत कमाल तापमान घट होणार असून, ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. पुण्यात बुधवारी (दि.25) कमाल तापमान 35 अंशांवर गेल्याचे पाहिला मिळाले.
शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविण्यात येत होते. मात्र, मंगळवारी यामध्ये मोठी वाढ झाली. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ३७ अंश सेल्सिअस तर उपनगरामध्ये ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. किमान तापमान देखील १९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे शहरातील उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. मात्र, यामध्ये पुढील तीन ते चार दिवसांत मोठी घट होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
पुणे आणि परिसरात बुधवारी (ता. २५) किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून, कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर गुरूवारपासून (ता. २६) कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
हेदेखील वाचा : देशातील अनेक भागांत वातावरणात बदल; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून अंदाज






