आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा हाहा:कार; 15 जिल्ह्यांना मोठा फटका, सुमारे 11000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले
अमरावती : आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाने हाहा:कार उडाला आहे. आंध्रच्या ओंगोलेजवळ मंगळवारी सकाळी किनारपट्टी ओलांडलेल्या या तीव्र चक्रीवादळामुळे 15 जिल्ह्यांतील जनजीवन आणि शेती उद्धवस्त झाली आहे. वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी पर्यंत पोहोचला होता, तर वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी १२० किमीपर्यंत पोहोचला होता.
राज्य सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार, १५ जिल्ह्यांमध्ये ३०६६१ एकर उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे हजारो झाडे उन्मळून पडली, शेकडो विजेच्या खांबांचे नुकसान झाले आणि अनेक किनारपट्टी भागात पाणी साचले. प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली असून, १०८०५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी गृहमंत्री अमित शाह यांना वादळामुळे झालेल्या नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती दिली. तसेच देशाच्या विविध भागांमध्ये हवामान बदलले आहे. बंगालच्या उपसागरातून आलेल्या या तीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व, मध्य आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याचा वारा सुरू राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, ओडिशा आणि तेलंगणा येथील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमधील अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचीही शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही पाणलोट क्षेत्रांमध्ये अचानक पूर येण्याचा मध्यम धोकाही व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पाऊस; हवामान विभागाकडून अलर्ट
पुढील काही दिवसांत पूर्व आणि पश्चिम, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा अपेक्षित आहे. वीज पडण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात पाऊस सुरू राहील. तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल येथेही मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील केदारताल ट्रेकवर ७ ट्रेकर्ससह बेपत्ता झालेल्या ८ जणांचा शोध मंगळवारी पाचव्या दिवशीही सुरू होता. हिमवादळे, हिमस्खलन आणि दुर्गम भूभागामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे.
FAQ
प्रश्न 1: चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोणत्या राज्याला बसला?
उत्तर: आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला.
प्रश्न 2: चक्रीवादळाने किनारपट्टी कुठे ओलांडली?
उत्तर: ओंगोलजवळ मंगळवारी सकाळी चक्रीवादळाने किनारपट्टी ओलांडली.
प्रश्न 3: किती जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले?
उत्तर: आंध्र प्रदेशातील १५ जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फटका बसला.






