thackeray shinde munde jarange patil darsa melava 2024
मुंबई : देशभरामध्ये दसरा सणाचा जोरदार उत्साह आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र राजकीय दसरा मेळाव्याची धुमधाम पाहायला मिळत आहे. दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून राजकीय पक्षांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता यावेळेचे दसरा मेळावे जोरदार गाजणार आहेत. सायंकाळी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते सीमोल्लंघन करणार आहेत. हे सीमोल्लंघन राजकीय असून तुफान टोलेबाजी आणि टीका होताना दिसणार आहे,
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा होणार आहे. शिवाजी पार्कवर जोरदार तयारी सुरु असून शिवसैनिकांमध्ये अनोखा उत्साह दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाची ही दसरा मेळाव्याची परंपरा यावर्षी देखील कायम राहणार आहेत. मात्र यावर्षी मेळाव्यावर पावसाचे सावट आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मैदानावर चिखल असून ते व्यवस्थित करण्य़ाचे काम शिवाजी पार्कवर सुरु आहे.
ठाकरे गटाच्या मेळाव्याला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातून उत्तर दिले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समर्थकांना संबोधित करणार असून यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील हा तिसऱ्यांदा दसरा मेळावा होणार असून यामुळे शिंदे गट समर्थक देखील जोरदार तयारी करत आहेत. एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगताना दिसणार आहे. आगामी विधानसभेमुळे या टीकेची धार आणखीच वाढलेली दिसून येईल.
12 वर्षांनंतर भाऊ-बहीण एकत्र
त्याचबरोबर बीडमध्ये देखील जोरदार राजकीय टोलेबाजी होताना दिसणार आहे. भगवान भक्तीगडावर विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. यावर्षी मुंडेंचा दसरा मेळावा हा विशेष आहे कारण यामध्ये भाऊ बहिण तब्बल 12 वर्षांनंतर एकत्र येणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडे हे पहिल्यांदा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मुंडेंच्या दसरा मेळावा लक्षवेधी ठरत आहे. पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील उपस्थित राहणार आहे. बीडमध्ये लोकसभेला ज्याप्रमाणे ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र पाहायला मिळाले. त्याचबरोबर दसरा मेळाव्यामध्ये दिसणार आहे.
हे देखील वाचा : उमेदवारी कोणाला पण द्या, शिराळ्यात कमळ फुलवणारचं; देशमुख व महाडीक यांची भूमिका
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा देखील दसरा मेळावा होणार आहे. य़ावर्षी जरांगे पाटील यांचा पहिलाच दसरा मेळावा असून नारायणगडावर होणार आहे. नारायण गडावर फुलांची जोरदार तय़ारी करण्यात आली असून फुलांनी नारायणगड सजवण्यात आले आहे. त्याबरोबर 100 किलो बुंदीचे लाडू तयार करण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर सत्ताधारी नेते असणार आहेत.
डिजीटल स्वरुपाचा मेळावा
या वर्षी पहिल्यांदा राज ठाकरे सुद्धा महाराष्ट्रातील लोकांशी संवाद साधणार आहेत. पॉडकास्टच्या माध्यमांतून राज ठाकरे हे दसऱ्याच्या मुहूर्तावर संवाद साधणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीमुळे राज ठाकरे यांचे मत आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी मनसैनिक उत्सुक आहेत. राज ठाकरे हे नवीन पद्धतीचा वापर करुन संवाद साधणार आहे. कोणत्याही सभा आणि मैदानाशिवाय ते पॉडकास्टचा वापर करुन पहिल्यांदा डिजीटल स्वरुपाचा मेळावा घेणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व दसरा मेळावे महत्त्वाचे ठरणार आहेत.