फोटो सौजन्य - Social Media
सध्या शेतीची कामे जोरात सुरू असून जमिनीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर वापरला जात आहे.मात्र याच शेतकऱ्याच्या अवजारावर विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे.दरम्यान, अशा ट्रॅक्टर वरील कारवाई शिथिल करावी असे पत्र कर्जत तहसीलदार यांच्याकडून विभागीय परिवहन अधिकारी यांना देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर वर आता कारवाई होणार नाही.
कर्जत तालुक्यात शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात असून पावसाळा सुरू झाल्याने शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरने शेतावर जात असतात.
परंतु अलीकडे काही दिवसांपासून पनवेल येथील विभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाकडून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती.यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले असून जमिनीची मशागत करणे कठीण होऊन बसले आहे.अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनीच्या मशागती साठी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. अशावेळी या ट्रॅक्टर वर विभागीय परिवहन अधिकारी पनवेल कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे.
या कारवाई विरोधात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा चे उपाध्यक्ष सुनील गोगटे आणि त्यांचे सहकारी यांनी तहसीलदार कर्जत यांना निवेदन दिले आणि त्यांना शेतकऱ्यांची वस्तुस्थिती समजावून सांगितली. दरम्यान शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखणे म्हणजे त्यांचा हक्क हिरावून घेणे असे सुनील गोगटे यांनी कर्जत तहसीलदार यांना यावेळी बोलताना सांगितले.
कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत पनवेल आरटीओ यांना पत्र पाठवून शेतीसाठी जाणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करू नये अशी विनंती केली. ही कार्यवाही म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक पाऊल आहे. प्रशासनाने वेळेवर लक्ष दिले याबद्दल त्यांचे शेतकरी वर्गाने आभार व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी गोगटे हे सदैव कटिबद्ध आहेत आणि भविष्यातही त्यांच्या हितासाठी ठामपणे लढत राहीन असे सुनील गोगटे यांनी बोलताना सांगितले.
याप्रसंगी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, कर्जत ग्रामीण मंडळाचे तालुका अध्यक्ष दिनेश रसाळ, किसान मोर्चा चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, किसान मोर्चा चे तालुका अध्यक्ष शिरीष कदम, कर्जतचे सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता,युवा मोर्चा शहराध्यक्ष सर्वेश गोगटे,राव आदी उपस्थित होते.