
अकलूज : राज्याच्या राजकारणात मोहिते-पाटील यांची काय चकम आणि धमक आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कालच्या पोरा-ठोराने ते सांगण्याची गरज नाही. मोहिते-पाटील पिढीजात राजकारणी आहेत. ज्यांची राजकिय कारकिर्द आत्ता कुठे सुरू झाली अाहे, त्यांनी मोहिते-पाटलांचे माप काढण्याची गरज नसल्याची टिका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. अकलूज येथे अायाेजीत ताराराणी केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरणा प्रसंगी ते बोलत होते.
पंढरपूर येथे झालेल्या सभेत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मोहिते-पाटील यांच्यावर टिका करताना अकलूजमध्ये पूर्वी सारखी चकम आणि धमक राहिली नसल्याची टिका केली होती. त्यांच्या या टिकेचा अनेक नेत्यांनी खरपूस समाचार घेतला.
प्रास्ताविकात धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, गावोगावी होणाऱ्या कुस्ती स्पर्धेमध्ये काही महिला मल्ल सहभागी होतात. परंतु त्यांना पुरूष मल्लांपेक्षा फारच कमी बक्षिस दिले जाते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महिला मल्ल घडवायचे असतील तर हा भेदभाव बंद झाला पाहिजे. ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजक शितलदेवी मोहिते-पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर, प्रेक्षक, कुस्तीगीर परिषद यांचे आभार मानले.
रोहित पवार पोस्टर बॉय
आमदार राम सातपूते म्हणाले, रोहित पवार म्हणजे फक्त पोस्टर बॉय आहे. काहीतरी बिनबुडाचे वक्तव्य करून चमकोगीरी करणेच त्यांना जमते. काही वर्षांपूर्वी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. परंतु मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून हा बालेकिल्ला भाजपाच्या स्वाधिन केला. विजयसिह माेिहते पाटील व रणजितसिंह माेहिते पाटील यांची राजकिय ताकद अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. तरीही तुम्हाला मोहिते-पाटलांची आणखी धमक पाहायची असेल तर येत्या निवडणुकांमध्ये पहा, असे सातपुते म्हणाले.
महिला केसरीला परवानगी देऊ
धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, महाराष्ट्रामध्ये माळशिरस तालुक्यात सर्वात जास्त कुस्तीचे आखाडे आहेत. गेली पाच वर्षे आम्ही महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यासाठी कुस्तीगीर परिषदेकडे मागणी करत होतो. परंतु आम्हाला ती परवानगी मिळाली नाही. आता २०२६ मध्ये होणाऱ्या महिलांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याची परवानगी आम्हाला कुस्तीगीर परिषदेने द्यावी. यावर कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी पुढची स्पर्धा भरवण्याची परवानगी तुम्हालाच देवू असे आश्वासन दिले.