
फोटो सौजन्य: Gemini
या बंदी असलेल्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या कॅल्शियम कार्बाईड गन संगमनेर परिसरात सर्रास विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, बिबट्याच्या भीतीचा फायदा घेत त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. संगमनेर व अकोले तालुक्यातील जलसमृद्ध बागायती पट्ट्यात गेल्या काही वर्षांत बिबट्यासह तरस या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून, या पार्श्वभूमीवर रानवस्तीतील शेतकरी विविध उपायांचा अवलंब करत आहेत.
कॅल्शियम कार्बाईड गनमुळे प्राण्यांना थेट इजा होत नसली, तरी स्फोटाच्या तीव्र आवाजामुळे बिबटे त्या ठिकाणाहून पळून जातात, असा दावा केला जातो. शहरी भागात माकडांना पळवून लावण्यासाठी तर ग्रामीण भागात शेतकरी वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी अशा गनचा वापर करतात. अवघ्या २०० ते २५० रुपयांत मिळणाऱ्या या गन ई-कॉमर्स संकेतस्थळांवरही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
बिबट्याच्या भीतीपोटी या गनचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्या घरातील लहान मुलांना खेळणे म्हणून देऊ नयेत, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. गॅस तयार होण्यास जास्त वेळ लागल्यास मोठ्या प्रमाणात वायू साचून पीव्हीसी पाईपचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा स्वस्त आणि असुरक्षित उपकरणांचा वापर टाळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
संगमनेर शहराबाहेरील नाशिक–पुणे राज्य महामार्गालगत संगमनेर कॉलेज ते घुलेवाडी दरम्यान काही विक्रेत्यांकडून या घरगुती बंदुकांची विक्री केली जात आहे. बाजारात सहज उपलब्ध असलेल्या पीव्हीसी पाईप व गॅस लायटरच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या या खेळणेवजा बंदुकीत कॅल्शियम कार्बाईड हा गॅस वेल्डिंगसाठी वापरला जाणारा रासायनिक पदार्थ टाकून त्यावर पाणी घातले जाते. त्यातून निर्माण होणाऱ्या अभिक्रियेमुळे मोठा आवाज होतो.
मध्यप्रदेश व गुजरातसारख्या राज्यांमध्येही या कॅल्शियम कार्बाईड गनचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येते. मात्र या गनमधील रासायनिक अभिक्रिया नियंत्रित स्वरूपाची नसते. स्फोटाची तीव्रता व प्रमाण यावर नियंत्रण नसल्यामुळे हा प्रकार धोकादायक ठरू शकतो. यामधून तयार होणाऱ्या ॲसिटीलीन वायूमुळे डोळ्यांच्या पडद्याला (रेटिना) इजा होण्याची किंवा डोळ्यांत तीव्र जळजळ होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.