संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान एक भीषण दुर्घटना घडली आहे. विषारी वायूने गुदमरून एकाचा मृत्यू झाला असून त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संगमनेर तालुक्यात शोककाळा पसरली आहे. दरम्यान याच घटनेत मदतकार्यात काम करणारे माजी सैनिक यांची देखील प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. अतुल रतन पवार, रियाज जावेद पिंजारी असे मृत झालेल्या तरुणांची नावे असून यामध्ये माजी सैनिक असलेले प्रकाश कोटकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तातडीचे उपचारासाठी सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी (Sewage Treatment Plant) प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी शहरात जागोजागी भूमिगत गटारांचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. आज कोल्हेवाडी रोडवरील कामादरम्यान एका कर्मचाऱ्याचा गटारात जीव गुदमरला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर कर्मचाऱ्यांचा आणि काही स्थानिक नागरिकांचाही गटारातच श्वास कोंडला आहे. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, इतर पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. या घटनेमुळे संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाच्या कामाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भूमिगत गटार कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या का, केल्या असतील तर विना सुरक्षा व्यवस्था कर्मचाऱ्यांना आत मध्ये जाऊ कसे दिले यांसारखे अनेक प्रश्न चौकशीतून होण्याची मागणी स्थानिक नागरिकांनामधून होत आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, निखिल पापडेजा आदींसह संगमनेर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित झाले होते. दरम्यान माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकाऱ्यांकडून संबंधित घटनेची माहिती घेऊन प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.या गंभीर दुर्घटनेमुळे संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाच्या कामातील सुरक्षा उपाययोजनांवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भूमिगत गटार कामादरम्यान आवश्यक सुरक्षा मानके पाळली गेली होती का, याबाबत सखोल चौकशीची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे भूमिगत कामांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.