सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले
या प्रकरणाची संपूर्ण माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील उपस्थित होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता शेटफळे (ता. आटपाडी) येथील मालन मारुती जाधव (वय ८३) या लघवीसाठी बाहेर जाऊन परत घरात येत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. आरोपीने त्यांना धक्का देऊन खाली पाडले, हात पिरगळला, छातीत लाथा मारून अंगावरील सुमारे १४ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३० भार वजनाचे चांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच आरोपीने त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून काडीपेटीने पेटवून दिले.
गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना प्रथम आटपाडी ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना ३ जुलै २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत फिर्यादी विठ्ठल मारुती जाधव यांच्या तक्रारीवरून आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते. जखमी महिला बेशुद्ध असल्याने त्यांचा जबाबही नोंदवता आला नव्हता. त्यामुळे तपासास मोठे आव्हान निर्माण झाले होते. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विविध अंगांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित राजेश दिलीप गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मयत मालन जाधव यांच्या नावावर बलवडी व शेटफळे येथे शेती होती. त्यांनी काही जमीन नातू प्रवीण जाधव यांच्या नावावर केल्याने कुटुंबात नाराजी होती. आरोपी हा त्यांच्या नातीचा पती असून, वृद्ध महिला घरी एकट्याच राहत असल्याची संधी साधून त्याने चोरीचा कट रचला. चोरीदरम्यान महिलेने प्रतिकार केल्याने त्याने त्यांना पेटवून दिल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस निरीक्षक संतोष पवार पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.






