थोपटे, जगतापांच्या प्रवेशामुळे बारामती मतदारसंघात भाजपची ताकद वाढली; सुप्रिया सुळेंसमार असणार आव्हान
बारामती/अमोल तोरणे: भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसची सोडचिट्टी घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाठोपाठ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी देखील भाजपचे मांडलिकत्व स्वीकारल्याने बारामती लोकसभा मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे, त्यातच जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती प्रवीण माने देखील भाजपमध्ये गेले आहेत. भाजपचा बारामती लोकसभा मतदारसंघातील वाढलेला जनाधार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामती लोकसभेची जागा महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. नणंद विरुद्ध भावजय अशी ही चुरशीची लढत देशात गाजली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन भाजपबरोबर हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या दृष्टीने देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची तर शरद पवार यांच्या दृष्टीने ही अस्तित्वाची होती. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना पराभव करण्याचा भाजप महायुतीचा डाव फसला. गेली दहा वर्षांपासून बारामती लोकसभा मतदार संघात अधिक ताकद लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे.
स्वकियांमधील लढाईत सुळेंना फायदा
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा झाला होता. त्यावेळी व्हीआयपी नेत्यांच्या प्राबल्याखाली असलेल्या मतदार संघाची जबाबदारी भाजपने विविध केंद्रीय मंत्र्यांकडे दिली होती. यामध्ये सितारामन यांच्याकडे बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदार दिली होती. सितारामन यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या मतदार संघाचा आढावा घेतला होता. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजपची ही मोहिम थांबली होती. सुनेत्रा पवार यांना महायुतीने उमेदवारी देऊन एक प्रकारे अंदाज घेतला. स्वकियांमधील लढाईत फायदा सुप्रिया सुळे यांनाच झाला. या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मतदारसंघातील विविध संस्थांवर प्राबल्य
भोर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांच्याकडून पराभूत झालेले काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर इंदापूर विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने अपक्ष लढलेले प्रवीण माने यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. नुकताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी देखील अनपेक्षितरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान संग्राम जगताप व संजय जगताप विद्यमान आमदार नसले तरी, त्यांचे आपल्या विधानसभा मतदारसंघात विविध संस्थांवर असलेले प्राबल्य पाहता भाजपची ताकद त्यामुळे वाढली आहे. या दोन नेत्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेमध्ये मोठी मदत केली होती. आघाडीचा धर्म त्यांनी एकनिष्ठेने पाळला होता. आता हे दोन नेतेच भाजपबरोबर गेले आहेत. इंदापूरचे प्रवीण माने देखील भाजपसबत गेले आहेत. इंदापूरचे माजी आमदार व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असले तरी ते देखील भाजपकडे जाण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.
महाविकास अाघाडीकडे एकही अामदार नाही
दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाचा सध्याचा विचार करता पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे, भोर-वेल्हा मतदार संघात राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर, दौंडमध्ये भाजपचे ॲड राहुल कुल, इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे, तर बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्राबल्य आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सध्याच्या स्थितीला महाविकास आघाडीसोबत एकही विद्यमान आमदार नाही. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील वगळता एकही प्रभावी नेता महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघात दिसून येत नाही. त्यामुळे ही राजकीय परिस्थिती खासदार सुप्रिया सुळे यांना आगामी काळामध्ये अडचणीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थोड्या दिवसांवर आल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप बारामती लोकसभा मतदारसंघासह पूर्ण जिल्ह्यामध्ये ताकद लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.