मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मनसे नेत्यांनी कल्याण डोंबिवली मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाचा प्रचारही केला. पण महाराष्ट्रात महायुतीचा मोठा पराभव झाला. देशातही भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेला कोणाशीही युती करण्याच्या भानगडीत पडणार नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका मनसे 225 ते 250 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
“225 ते 250 जागा लढवून ते कोणाला मदत करू इच्छितात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ते मोदीजी किंवा अमित शाहांना मदत करू इच्छितात जे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत, अशा शक्ती महाराष्ट्रात आहेत जे दाखवतात एक आणि करतात दुसरेच. ते त्यांच्या पक्षाचे मालक आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात आमची ही लढाई सुरूच राहिल आणि जोपर्यंत महाराष्ट्रात आमची सत्ता येत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहिल.
संजय राऊत म्हणाले, “लोक बोलतात एक आणि करतात दुसरेच. राज ठाकरे नुकतेच परदेशातून आले आहेत. ते बराच वेळ परदेशात होते, त्यामुळे राज्यात काय चाललयं हे जाणून घ्यायला त्यांना वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शाहाजी यांना बिनश’र्ट’ पाठिंबा दिला. म्हणजे शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला असे उद्धवजींनी सांगितले होते. म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिला होता. जणूकाही महाराष्ट्रावर फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शाहांचा जन्म झाला आहे, असा सणसणीत टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
‘ज्या मोदी शाहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असे ते म्हणाले होते त्यांनाच बिनशर्त पाठिंबा दिला यातच सर्वकाही आलं. आता एका महिन्यातच त्यांची भूमिका कशी बदलते. 288 का 232 ज्या काही जागा ते लढणार आहे. हे आश्चर्यकारक आहे. ही त्यांची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकून करण्यासाठी जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ती पावले उचचली जात आहेत का हे पाहावे लागेल. पण यावर फार काही बोलण्यात अर्थ नाही.काही पक्ष काही संघटना काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी निर्माण झाले आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
राज्यात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांमुळे राजकारण अत्यंत खालच्या थराला गेले आहे असे तुम्ही म्हणालात, यावर बोलताना राऊत म्हणाले, हे मीच नाही संपूर्ण देशातील जनताच म्हणत आहे. मोदीजी पंतप्रधान झाले म्हणजे असे नाही की निवडणूक जिंकून पंतप्रधान झाले, मोदीजी आणि त्यांचा पक्ष निवडणूक हरले आहेत. हा एनडीएचा फंडा नंतर आला तो आधी नव्हता, मोदीजी अल्पमतात आल्यानंतर त्यांनी एनडीएचे भजन सुरू केले. त्यामुळे आता तुम्हीही स्वीकारा की मोदीजी निवडणूक हरले आहेत. तुम्ही पाहिले असेल मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांना खंडणी देऊन त्यांनी आपली खुर्ची वाचवली आहे. अर्थसंकल्पात ज्या प्रकारे त्या दोघांना पैसा दिला गेलाय तो खूर्ची वाचवण्यासाठी दिला गेला आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.