मुंबई: भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतोय आणि पराभवाच्या भितीने विरोधकांवर हल्ले करण्यासाठी सचिन वाझे सारख्या संत महात्म्यांच्या वापर भाजप करत असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव मान्य केलाय, असे म्हणावे लागेल. अशी जळजळीत टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपाने राजकारण तापल आहे. अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने प्रतिक्रीया देत अनिल देशमुखांवर आरोप केले. या आरोप- प्रत्यारोपांवरून संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
सचिन वाझेच्या आरोपांनतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सचिन वाझेच्या आरोपांवरून फडणवीसांवरच निशाणा साधला आहे.”अँटिलीया प्रकरणात बाँब ठेवले गेले, मनसुख हिरेन सारख्या निरपराध व्यक्तीचा खून केला गेला. महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी, त्यातला एक मुख्य आरोपी पोलीस आयुक्तांना भाजपने क्लीन चिट दिली. उरलेले दोन आरोपी सुटले असून ते आता मिंधे गटात आहेत. त्यांच्यासाठी काम करतात.
अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली. त्यांनी फडणवीसांवर आरोप केले. त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होते. पण उत्तर देण्यासाठी त्यांनी तुरुंगातला प्रवक्ता लागतो हेच देशात पहिल्यांदाच पाहिले. खुन आणि दहशतवादाचे आरोप असलेला एक तुरुंगातला व्यक्ती त्यांना प्रवक्ता म्हणून लागतोय. गेल्या एक वर्षांपासून मी सांगतोय राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधील काही लोक गुंडांचा, टोळ्यांचा आणि तुरुंगातल्या लोकांचा वापर करत आहेत. हे आता सिद्ध झाले.” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले, ‘कोणी काय बोलावे, हे सांगण्यासाठी सरकारचे प्रितीनिधीच तुरुंगात जातात, तिथल्या अधिकाऱ्यांना फोन करतात, पण तुम्ही तुरुंगातील एका दहशतवाद्याच्या वक्तव्याला इतके महत्त्व देत आहात. कोणालातरी तुरुंगातून बाहेर आणले जाते, तो सांगतो मी फडणवीसांना पत्र लिहीले. भाजपच्या सगळ्या लोकांची नार्को टेस्ट करा म्हणजे गेल्या दहा वर्षांत कोणी काय कांड केलेत ते कळेल.”
‘अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, संजय सिंह, दिल्लीचे मु्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल आम्हा सर्वांना ईडी, पोलीस आणि तपास यंत्रणांचा गैरवापर करून आम्हाला अ़डकवण्यात आले. त्यावेळचे मुंबईचे पोलीस आयुक्त आणि या सर्व प्रकरणाचे मुख्य आरोपी त्यांना मोकळे सोडण्यात आले, कारण त्यांनी अनिल देशमुखांवर आरोप केले होते. आता वाझेने जयंत पाटील यांचे नाव घेतले. मी असे 10 आरोपी उभे करू शकतो जे फडणवीसांचे, बावनकुळेंचे नाव घेतील. अमित शाहा तर आधीच तुरुंगात जाऊन आलेत,’ असेही संजय राऊत म्हणाले.
‘या राज्यातील राजकारणाची पातळी किती खाली आणायची हे या राज्यातील राजकारण्यांनी ठरवायला पाहिजे फडणवीसांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाचे डर्टी पॉलिटिक्स करून टाकलयं. फडणवीसांनी वाझेचे आरोप खोट असल्याचे सांगितले पाहिजे पण ते तर टाळ्या वाजवत आहेत. महाराष्ट्राला अशा राजकारणाचा तिरसक्रा आहे.पण देवेद्र फडणवीस हेच या डर्टी पॉलिटीक्सचे सुत्रधार आहे,’ असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.