सातारा जिल्हा बँकेत सत्तासंघर्ष तापणार! आचारसंहिता लागू; १ मतदान तर ३ नोव्हेंबरला निकाल
उमेदवारी निश्चितीपासून पॅनेलच्या बांधणीपर्यंत पुढील काही दिवसांत जोरदार हालचाली होण्याची चिन्हे आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची आचारसंहितालागू झाली असून एक नोव्हेंबर रोजी मतदान तर तीन नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात विविध राजकीय गटांचा प्रभाव असल्याने ही निवडणूक केवळ सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची निवड न राहता स्थानिक राजकीय समीकरणांचीही परीक्षा घेणारी ठरणार आहे.
High Court on DJ-Loudspeaker: सण-उत्सवांत डीजे- लाऊडस्पीकर वाजवायचाय? आधी ‘ही’ बातमी वाचाच, नाहीतर…
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच इच्छुकांची संख्या आणि त्यामागील गट स्पष्ट होऊ लागतील. त्यानंतर माघारीच्या टप्प्यात कोणत्या उमेदवारांना एकत्र आणले जाते आणि कोणत्या मतदारसंघात थेट लढत राहते, यावर निवडणुकीचे अंतिम चित्र अवलंबून असेल. दरम्यान, जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २०१९ मतदार असल्याने प्रत्येक मतदारसंस्थेशी संपर्क आणि मतदारसंघनिहाय बैठकांना महत्व प्राप्त होणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच संस्थांच्या पदाधिका-यांशी संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे. पॅनेलची बांधणी, संभाव्य उमेदवारांची निवड आणि स्थानिक गटांना सामावून घेण्याचे आव्हान प्रमुख नेत्यांसमोर राहणार आहे.
महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट याच्यातील स्थानिक समन्वय कसा होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः विद्यमान संचालकांना पुन्हा संधी मिळणार का, नव्या चेह-यांना संधी देण्यात येणार का, कोणत्या मतदारसंघात कोणत्या गटाचे प्राबल्य आहे आणि संभाव्य उमेदवारांमागे किती संस्थात्मक ताकद आहे, यावर उमेदवारीची गणिते ठरण्याची शक्यता आहे.
काही मतदारसंघांत पक्षीय समीकरणांपेक्षा स्थानिक गटांचे संबंध आणि सहकारी संस्थामधील संपर्क अधिक महत्वाचा ठरू शकतो. कृषी पतपुरवठा व विकास सेवा सोसायट्या, महिला, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, कृषी पणन, शेतीमाल प्रक्रिया, नागरी बैंका व पतसंस्था, दूध उत्पादक, औद्योगिक, गृहनिर्माण, विणकर, मजूर आणि पाणीपुरवठा अशा विविध मतदारसंघातून संचालकांची निवड होणार आहे, त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचे स्वतंत्र राजकीय गणित महत्त्वाचे ठरणार आहे.
अर्ज दाखल करणे: २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर (सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत)
दाखल अर्जांची यादी: दररोज सायंकाळी ४:०० वाजता प्रसिद्ध केली जाईल.
अर्जांची छाननी (Scrutiny): ५ ऑक्टोबर, दुपारी १२:०० वाजता.
वैध अर्जांची अंतिम यादी: ६ ऑक्टोबर, सकाळी ११:०० वाजता.
अर्ज मागे घेण्याची मुदत: ६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत.
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: २२ ऑक्टोबर, सकाळी ११:०० वाजता.
मतदान (Voting): १ नोव्हेंबर (सकाळी ८:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत).
मतमोजणी (Counting): ३ नोव्हेंबर (सकाळी ८:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत).






