आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल (Photo Credit- X)
मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसत आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा गाजत असताना दोन्ही शिवसेनेच्या विलीनीकरणाबाबतही चर्चा रंगू लागल्या होत्या. आता मात्र पुन्हा एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. विलीनीकरणाच्या चर्चा या फोडाफोडीच्या चर्चांपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याचे संकेत दिले आहेत.
हे ऑपरेशन नेमकं कधी होणार आणि कोणत्या नेत्यांना लक्ष्य केलं जाणार, याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटात नेमकं काय घडणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून शिंदे गटाला चांगलंच सुनावलं आहे. (Aaditya Thackeray)
उदय सामंत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी केवळ पक्षांतराच्या राजकारणावरच नाही, तर राज्यातील अनेक प्रश्नांवर सरकारला घेरलं. पैसा आणि सत्तेसाठी काही नेत्यांनी पक्ष सोडल्याचा आरोप त्यांनी केला. राजकारणाचा स्तर इतका खाली गेला आहे की, सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी फक्त सत्तेचे खेळ सुरू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
राज्यातील पाणीटंचाई, शेतकऱ्यांची अवस्था, वाढतं प्रदूषण आणि उद्योगधंद्यांचं स्थलांतर या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. नाशिकमधील रस्त्यांची अवस्था आणि मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘ऑपरेशन टायगर जरूर करा, पण त्याआधी महाराष्ट्राचे काय हाल झालेत, ते पाहा.’
खासगीकरणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपशासित महानगरपालिकांवर निशाणा साधला. सरकारी रुग्णालयांपासून ते सार्वजनिक सुविधांपर्यंत सगळंच खासगी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही ऑपरेशन टायगरवरून शिंदे गटाची फिरकी घेतली. दोन्ही पक्ष अमित शाहांचे असून शिंदे गटाला स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून काम करावं लागत असल्याची टीका त्यांनी केली. ‘ऑपरेशन टायगर सांगितलं म्हणजे त्यांनी आम्हाला टायगर असल्याचं मान्य केलं,’ असा टोला राऊतांनी लगावला. तसेच अमित शाहांच्या दोन पक्षांनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा, असंही ते म्हणाले.
एकूणच, ऑपरेशन टायगरच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. आता शिंदे गट खरंच ठाकरे गटाला धक्का देणार की ही केवळ राजकीय खेळी ठरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका
Ans: शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवण्याचे संकेत दिले आहेत.
Ans: ऑपरेशन टायगर करण्याआधी राज्यातील पाणीटंचाई, बेरोजगारी, उद्योगधंद्यांचे स्थलांतर आणि प्रदूषण यांसारख्या प्रश्नांकडे लक्ष द्या, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
Ans: ऑपरेशन टायगर म्हटलं म्हणजे शिंदे गटाने आम्हाला टायगर असल्याचं मान्य केलं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच शिंदे गटाच्या राजकीय भूमिकेवरही त्यांनी टीका केली.






